Nandita Patkar Married in Uttarakhand Temple:अनेक दर्जेदार मालिका, सिनेमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री नंदिता पाटकर (Nandita Patkar) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे तिच्या लग्नामुळे. वयाच्या 44 व्या वर्षी अभिनेत्रीने मुंबईत कायदेशीर पद्धतीने लग्न केलं. आता नवऱ्यासोबत उत्तराखंडमधील त्रियुगीनारायण मंदिरात तिने विधिवत लग्न केलं आहे. सोशल मिडीयावर पोस्ट करत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नंदितानं नाट्य दिग्दर्शक विपुल महागावकर (Vipul Mahagaonkar) यांच्याशी आपली साताजन्माची गाठ बांधली आहे.
नंदिता पाटकरने ‘एलिझाबेथ एकादशी’ सिनेमात काम केलं. स्टार प्रवाहच्या ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेमुळे घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. याशिवाय नंदिताने ‘खारी बिस्किट’, ‘लालबागची राणी’ या सिनेमांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
उत्तराखंडमधील त्रियुगीनारायण मंदिरात बांधली लग्नगाठ
सध्या नंदिता पाटकर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मुंबईत कोर्ट पद्धतीने लग्न केल्यानंतर उत्तराखंडमधी त्रियुगीनारायण मंदिरात तिनं लग्नगाठ बांधली आहे. इंडस्ट्रीत येण्यापूर्वीच नंदिताचं लग्न झालेलं, पण पुढे काही दिवसांतच संसार मोडला आणि तिचा घटस्फोट झाला. आता नंदितानं दुसऱ्यांदा आपली लग्नगाठ बांधली असून आपल्या नव्या संसाराला सुरुवात केलीय. अभिनेत्री नंदिता पाटकर आणि नाट्य दिग्दर्शक विपुल महागावकर दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये दोघेही नवविवाहित दाम्पत्याच्या वेशात दिसत आहेत. जांभळ्या रंगाची सुंदर साडी, हातात हिरव्या बांगड्या, केसात गजरा या लूकमध्ये नंदिता खूपच सुंदर दिसत होती. तिने पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
ती म्हणाली " काही क्षण आपण प्लॅन करतो, तर काही क्षण आपल्यासाठी आधीच ठरलेले असतात. आणि हा त्यापैकीच एक खास क्षण होता.एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवणं, आपले कवच खाली ठेवणं सोपं नव्हतं. पण हळूहळू ते आपोआप घडलं… आणि आम्ही दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला.अशा ठिकाणी, जे स्त्री आणि पुरुषाच्या पवित्र मिलनाचं प्रतीक आहे. जरी तिथे जाण्याचं स्वप्न आम्ही नेहमीच पाहिलं असलं, तरी ते खरंच साकार झालं तेव्हा सगळंच अविश्वसनीय वाटलं. त्रियुगीनारायण मंदिर येथे सर्व धार्मिक विधींनी लग्न करणं हा शब्दात न मावणारा अनुभव होता.खूप आभारी आणि blessed वाटतंय" असं तिने म्हटलं. काही दिवसांपूर्वी अभिनेता विशाल निकम व अक्षया हिंदळकर यांनी सुद्धा याच त्रियुगीनारायण मंदिरात लग्नगाठ बांधली होती.
