Nana Patekar Pays Emotional Tribute to DCM Ajit Pawar: 'अजित पवार हे माझे चांगले मित्र होते. ते माझ्यासाठी धाकट्या भावासारखे होते', असं म्हणत प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांनी अजित पवार यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला. नाना पाटेकर यांनी अजित पवार यांना आपल्या हृदयाच्या अगदी जवळचे म्हटले आहे. 28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. त्यांच्या निधानंतर राजकीय वर्तुळासह सिनेसृष्टीत खळबळ उडाली. दरम्यान, सिनेकलाकारांनीही अजित पवारांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. दरम्यान, नाना पाटेकर यांनीही भावनिक होत आपलं दु:ख व्यक्त केलं.
गुरूवारी एएनआयशी बोलताना, भावुक झालेल्या पाटेकर यांनी पवारांना त्यांच्या सुरुवातीच्या राजकीय कारकिर्दीपासून ओळखत असल्याचं सांगितलं. ज्येष्ठ अभिनेते म्हणाले, "अजित पवार यांच्या निधनानंतर आम्हाला प्रचंड दु:ख झाले आहे. ते 19 ते 20 वर्षांचे असतील, तेव्हापासून मी त्यांना ओळखतो आहे. राजकीय सुरूवात त्यांनी कार्यकर्ता म्हणून केली. मला त्यांची नेहमीच आठवण येईल. ते माझे सर्वात चांगले मित्र होते. ते माझ्यासाठी धाकट्या भावासारखे होते", असं म्हणत अजित दादांच्या निधनावर नाना पाटेकर यांनी दु:ख व्यक्त केलं.
"पवार कुटुंबाला आभाळ एवढं दु:ख पचवण्याची शक्ती मिळाली पाहिजे. आपण त्यांच्या दु:खात भागीदारी होऊ शकत नाही. कारण आमच्यासाठी देखील हे मोठं दु:ख आहे. परंतु, आपल्याला त्यांच्या दु:खात सहभागी व्हावं लागेल. मी त्यांना खूप मिस करेन", असं नाना पाटेकर म्हणाले.
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्याबाबत नाना पाटेकर म्हणाले, "खरंतर, सुनेत्रा पवार यांचं दु:ख इतरांपेक्षा खूपच वेगळं आहे. ते दु:ख त्यांना एकटीलाच सहन करावा लागेल. जो पदभार त्यांनी स्वीकारला आहे, त्याची जबाबदारीही त्यांना एकटीलाच पार पाडावी लागेल. वेळ लागेल यातून बाहेर पडायला, परंतु, त्या पदभार योग्यरित्या सांभाळतील", असंही नाना म्हणाले. रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर नाना म्हणाले, "रोहित पवार यांनी आपला काका गमावला आहे. त्यांच्या मनात असंख्य प्रश्न उपस्थित होतील. ते प्रश्न त्यांनी उपस्थित केले", असं नानांनी एएनआयशी बोलताना सांगितलं.
