Gadar 3 Update: सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर गदर 2 या चित्रपटाने चांगलीच जादू केली होती. या चित्रपटाला पाहण्यासाठी सिनेरसिकांनी सिनेमागृहात मोठी गर्दी केली होती. आता गदर-2 चित्रपटानंतर लवकरच गदर-3 हा चित्रपटही लवकरच येणार आहे. त्यासाठी तयारी चालू झाली आहे. दरम्यान, या चित्रपटात मराठमोळे अभिनेते नाना पाटेकरही झळकणार असल्याचं बोललं जातंय.
गदर-2 या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड्स मोडले होते. या चित्रपटातील गाणी लोकांना चांगलीच आवडली होती. गदर या चित्रपटाच्या प्रेमात पडलेल्यांनी गदर-2 हा चित्रपटही तेवढ्याच उत्सुकतेने पाहिला होता. रुपेरी पडद्यावर पुन्हा एकदा सनी देओल आणि अमिषा पटेल यांची जोडी पाहायला मिळणार, या एका कारणामुळे अनेकांनी हा चित्रपट पाहिला होता. विशेष म्हणजे गदर-2 या चित्रपटालाही लोकांचे चांगले प्रेम मिळाले. त्यामुळेच आता गदर-3 चित्रपटाचीही तयारी चालू झाली आहे. या चित्रपटात मात्र यावेळी चक्क नाना पाटेकर दिसणार असल्याचं बोललं जातंय. नाना पाटेकर या चित्रपटात खलनायकाची भूमिका निभावतील असं म्हटलं जातंय.
नाना पाटेकर अगोदर काय म्हणाले होते?
नाना पाटेकर गदर-3 या चित्रपटात घरंच दिसणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर खुद्द नाना पाटेकर यांनीच उत्तर दिलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना नाना म्हणाले की, मी खलनायकाच्या भूमिकेत असताना सनी देओल मला मारतोय, हे तुम्ही पाहू शकाल का? त्यामुळेच इच्छा असूनही काही भूमिका वठवल्या जाऊ शकत नाहीत. आम्ही दुसरा एखादा चित्रपट करू. मारामारीच्याच चित्रपटात आम्ही एकत्र काम करावं, असं काही नाही. आम्ही आणखी एखाद्या दुसऱ्या सिनेमात सोबत काम करू, असं नाना पाटेकर यांनी स्षष्ट केलं होतं.
नाना पाटेकर यांनी नुकतंच काय सांगितलं?
नाना पाटेकर यांनी 'द लल्लनटॉप'या वृत्तविषयक यूट्यूब चॅनेलला नुकतेच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी गदर-3 आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे अनिल शर्मा यांच्यावर भाष्य केलं. अनिल शर्मा हे मोठे दिग्दर्शक आहेत. ते चित्रपट फार चांगल्या पद्धतीने सजवतात, असं नाना पाटेकर यांनी सांगितलं. तर गदर चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनीदेखील नाना पाटेकर यांच्या गदर-3 या चित्रपटातील भूमिकेविषयी भाष्य केलं. माझी नाना पाटेकर यांच्यासोबत एक-दोन वेळा चर्चा झालेली आहे. गदर-3 चित्रपटात त्यांच्यासाठी भूमिका द्यावी, अशा स्थितीत सध्या चित्रपट नाही. पण या चित्रपटात कुठे जागा मिळाली, संधी भेटली, नाना पाटेकर यांना शोभणारे पात्र ठरले तर त्यावर विचार केला जाईल, असे अनिल शर्मा यांनी सांगितले.
हेही वाचा :