Nana Patekar emotional tribute Ajit Pawar in mumbai event: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. 28 जानेवारी हा संपूर्ण राज्यासाठी काळा दिवस ठरला. अजित पवार आज आपल्यात नाहीत, हे खरंतर मन मानायला तयार नाही, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. नेते मंडळींसह दिग्गजांनीही अजित पवार यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं. त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांनी सांभाळली. आज अजित दादांच्या निधनानंतर शोकसभेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम मुंबईतील वरळी डोम येथे पार पडत आहे.
या शोकसभेला देशातील आणि राज्यातील दिग्गज नेते उपस्थित आहेत. उद्योगपती आणि कलाकारांनीही हजेरी लावली आहे. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. या शोकसभेत उद्योगपती गौतम अडानी आणि मुकेश अंबानी देखील उपस्थित आहेत. यावेळी उपस्थितांनी अजित दादांच्या आठवणींना खास उजाळा दिला. तसेच अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार नाना पाटेकरही शोकसभेत उपस्थित आहेत. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना नाना पाटेकर भावुक झाले असल्याचं पाहायला मिळालं.
शोकसभेत नाना पाटेकर यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आणि म्हणाले, 'नमस्कार..माझा आणि दादांचा 50 वर्षांचा संबंध. दादा कार्यकर्ते होते. मी कधी बारामतीला गेलो, तर माझी सगळी उठबस दादा पाहत होते. अजित दादा तेव्हा 18-19 वयोगटातील असतील, मी 25 आणि शरद पवार 35 वयोगटातील असतील. 50 वर्षांचा खूप मोठा सहवास आहे. खूप जास्त आठवणी आहेत', असं नाना पाटेकर म्हणाले. 'आज या ठिकाणी इतकी मंडळी जमली आहेत, शोकसभेच्या ठिकाणी जर दादांचा आज 75वा वाढदिवस साजरा करायला जमलो असतो, तर जास्त बरं वाटलं असतं', असं म्हणत नाना पाटेकर यांनी अजित पवार यांच्या तसबीरासमोर हात जोडले, तसेच व्यासपीठावरुन भावुक होऊन खाली उतरले. यावेळी उपस्थित मंडळीही भावुक झाल्याची पाहायला मिळाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
