Munna Bhai MBBS Short Circuit: फिल्ममेकर राजकुमार हिरानी (Filmmaker Rajkumar Hirani) यांचा मुलगा वीर हिरानी (Vir Hirani) आता 'प्रीतम एंड पेड्रो'मधून आपला OTT डेब्यू करण्यासाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे, या सीरिजमध्ये त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेता अरशद वारसी (Bollywood Actor Arshad Warsi) देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. पण, तुम्हाला माहितीय का? वीर हिरानी आणि अरशद वारसी (Arshad Warsi) यांची ही एकत्र काम करण्याची पहिलीच वेळ नाही. दोघेही एकत्र 'मुन्नाभाई MBBS' (Munna Bhai M.B.B.S.) या गाजलेल्या सिनेमात एकत्र झळकलेले. आता तुम्ही म्हणाल, 24 वर्षांपासूनच्या सिनेमात वीर हिरानीनं कोणती भूमिका साकारलेली? बॉलिवूडच्या गाजलेल्या 'मुन्नाभाई MBBS' सिनेमात वीर हिरानीनं अरशद वारसी यांच्या मुलाची भूमिका साकारलेली.
'मुन्नाभाई MBBS' च्या गाजलेल्या सिनेमाच्या शेवटच्या सीनमध्ये अरशद वारसी यांच्या कडेवर एक लहान मूल दिसलेलं. म्हणजे, 'छोटा सर्किट' आठवला का? तोच होता वीर हिरानी. सिनेमात त्याला 'शॉर्ट सर्किट' म्हणून दाखवण्यात आलं होतं. आता अनेक वर्षांनंतर वीर हिरानी पुन्हा अरशद वारसीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
अरशद वारसी यांनी नुकताच सोशल मीडियावर 'मुन्नाभाई MBBS'च्या सेटवरील एक बिहाइंड-द-सीन्स (BTS) व्हिडीओ शेअर केलेला. यासोबतच त्यांनी नव्या सीरिजचा वीर हिरानीसोबतचा फोटोही पोस्ट केला. या पोस्टला त्यांनी मजेशीर कॅप्शन देत, "शॉर्ट सर्किट अब काफी लंबा हो गया है @virhirani.", असं लिहिलेलं. या पोस्टनंतर चाहत्यांमध्येही जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असून, वीरच्या ओटीटी डेब्यूबद्दल उत्सुकता वाढली आहे.
वीर हिरानी यानं अरशद वारसी यांच्या पोस्टवर भावूक प्रतिक्रिया देत, "24 वर्षांनंतर... आयुष्यानं वर्तुळ पूर्ण केलंय. लव्ह यू अरशद सर...", अशी कमेंट केली. या कमेंटनं अनेक चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं असून, दोघांमधील खास नात्याची पुन्हा चर्चा रंगली आहे.
एका मुलाखतीत बोलताना अरशद वारसी यांनी वीरसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिलेला. त्यांनी सांगितलेलं की, "वीर अक्षरशः माझ्या डोळ्यांसमोर मोठा झालाय. आम्ही पहिल्यांदा मुन्नाभाई MBBS दरम्यान एकत्र काम केलं होतं. त्या सिनेमात मी 'सर्किट'ची भूमिका साकारली होती, तर वीरनं माझा मुलगा 'शॉर्ट सर्किट'ची भूमिका केली होती. त्यावेळीही तो खूप उत्सुक आणि गोड मुलगा होता. सतत प्रश्न विचारणं आणि सेटवरील सगळ्यांना हसवणं हे त्याचं वैशिष्ट्य होतं..."
अरशद पुढे म्हणाला की, "आता इतक्या वर्षांनंतर प्रीतम अँड पेड्रो मध्ये त्याच्यासोबत सहकलाकार म्हणून काम करणं माझ्यासाठी खूप भावनिक आणि अविश्वसनीय अनुभव आहे. लहानपणी पाहिलेलं मूल आता एक गंभीर आणि प्रतिभावान अभिनेता म्हणून समोर उभं आहे, हे पाहणं खूप खास आहे..." दरम्यान, राजकुमार हिरानी निर्मित 'प्रीतम अँड पेड्रो' ही मालिका ३ जुलै रोजी JioHotstar वर प्रदर्शित होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
ABP माझाच्या बातम्या LIVE...
