Celebrities react to Mumbai metro bridge collapse: 14 फेब्रुवारी 2026 रोजी शनिवारी मुलुंड पश्चिम येथे मोठी दुर्घटना घडली. मेट्रो लाइन 4 च्या बांधकामादरम्यान काँक्रीटचा भाग कोसळला. मेट्रो पुलाचा स्लॅब थेट चार चाकी वाहन आणि रिक्षावर पडला. यामुळे या वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर, इतर तीन जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले आणि घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबाला 5 लाख रूपयांची भरपाई जाहीर केली आहे. या प्रकरणानंतर सामान्य जनतेसह सेलिब्रिटींनीही रोष व्यक्त केला.
स्टँड - अप कॉमेडियन आणि चित्रपट निर्माते वरूण ग्रोव्हर याने मुंबईला सर्वात भ्रष्ट शहर म्हटले आहे. तर, दिया मिर्झा आणि राहुल वैद्यसारख्या कलाकारांनी आवाज उठवला आहे. वरूण ग्रोव्हरने आपला संताप व्यक्त करत एक्सवर पोस्ट केले, 'मुंबई हे भारतातील सर्वात भ्रष्ट शहर आहे. भारताच्या व्यावसायिक राजधानीत सर्वात वाईट रस्ते आहेत. गेल्या दोन वर्षांत मी जवळजवळ प्रत्येक गावातील रस्ते पाहिले आहेत. ते मुंबईच्या रस्त्यांपेक्षा चांगले आहेत. हे खराब शहरी नियोजन आहे', असं म्हणत त्याने संताप तसेच नाराजी व्यक्त केली.
मुंबई मेट्रोच्या ढिसाळ कामाबाबत अभिनेत्री दिया मिर्झा आणि गायक राहुल वैद्य याने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. दिया मिर्झाने एक्स पोस्टवर, शहरी विकासाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 'तुम्ही पायाभूत सुविधांच्या कोणत्या संकल्पनेचे समर्थन करता? जी सामान्य नागरिकांचे जीवन गुदमरवते, त्यांच्या आरोग्याला आणि जीवनाला धोका निर्माण करते? की जी सामान्यांच्या सुरक्षिततेची, जीवनमानाची आणि कल्याणाची खरोखर काळजी घेते?' काहींनी सुरक्षिततेबद्दलच्या तिच्या चिंतेचे समर्थन केले.
राहुल वैद्य यानेही इन्स्टाग्रामवर आपली चिंता व्यक्त केली आहे. पूल कोसळल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना त्याने लिहिले की, 'मी जेव्हा जेव्हा मेट्रो पुलाखालून जातो, तेव्हा मला नेहमीच भीती वाटते. मला नेहमीच याची भीती वाटते', असं त्याने म्हटलं आहे. राहुल वैद्यची ही पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
