मुंबई : बॉलीवूडची सध्याची आघाडीची अभिनेत्री आलिया भट्टला अवमान नोटीस पाठवण्यात आली आहे. आलियाचा बहुचर्चित आगामी सिनेमा 'गंगूबाई काठियावाडी'मुळे आलिया अडचणीत सापडली आहे. हा सिनेमा आधीच वादाच्या भोव-यात आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनावर स्थगितीची मागणी फेटाळल्यानंतर आता गंगूबाई यांच्या मुलाने शिवडी सत्र न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. यावर मुख्य अभिनेत्री आलिया भट्ट आणि दिग्दर्शक-निर्माते संजय लीला भन्साळी यांना न्यायालयाने समन्स जारी केलं आहे. 


हा सिनेमा लेखक हुसैन जैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकावर आधारीत आहे. या पुस्तकातही अनेक चुकीचे आणि बोगस मुद्दे नमूद केले आहेत. त्यामुळे यावर आधारीत सिनेमाही चुकीच्या माहितीवर आधारित आहे, असा आरोप करत याचिकाकर्त्यांनी झैदी यांच्यावरही मानहानीचा दावा ठोकला आहे. गंगुबाई यांच्या दत्तक मुलाने हा फौजदारी मानहानीचा दावा केला आहे. बाबू रावजी शहा यांनी गंगुबाई यांचा दत्तक मुलगा असल्याचा दावा केला आहे. या सिनेमामुळे आमची आणि आमच्या परिवाराची बदनामी होत आहे असा शहा यांचा दावा आहे. 


गुरूवारी शिवडी दंडाधिकिरी न्यायालयाने याची दखल घेत 21 मे रोजी आलिया आणि भन्साळी यांच्यासह सिनेमाच्या लेखकालाही कोर्टात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. यापूर्वी मुंबई सत्र न्यायालयातही शहा यांनी दावा दाखल केला होता. मात्र सिनेमाच्या प्रदर्शना आधीच हा दावा जाणीवपूर्वक केला असल्याचा युक्तिवाद भन्साळी यांच्याकडून करण्यात आला. त्यावर सहमती दर्शवत सत्र न्यायालयाने हा दावा नामंजूर केला होता.