Mukul Dev Passed Away: 'सन ऑफ सरदार', 'आर... राजकुमार', 'जय हो' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते मुकुल देव यांचं वयाच्या 54 व्या वर्षी निधन झालंय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. मुकुल देव स्वतः एक सुप्रसिद्ध अभिनेता होता. तसेच, तो प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता राहुल देवचा भाऊ होता. मुकुल देवनं अनेक गाजलेल्या टेलिव्हिजन सीरिअल्समध्येही काम केलं आहे. त्याच्या निधनानं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर मुकुलला चाहत्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
1996 मध्ये टेलिव्हिजन शोमधून इंडस्ट्रीत डेब्यू
मुकुल देव यांचा जन्म 17 सप्टेंबर 1970 रोजी नवी दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात झाला. त्यांनी 1996 मध्ये 'मुमकिन' या टीव्ही मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. नंतर, टीव्ही व्यतिरिक्त, त्यांनी हिंदी तसेच पंजाबी, बंगाली, मल्याळम, कन्नड आणि तेलगू भाषेतील 60 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
मुकुल देव शेवटचा 'अँट द एंड' या हिंदी चित्रपटात दिसलेला. तो अभिनेता राहुल देवचा भाऊ होता. मुकुल देवचा जन्म नवी दिल्ली येथे जालंधरजवळील एका गावात पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचे वडील हरी देव हे असिस्टंट कमिश्नर ऑफ पोलीस होते.
शेवटी 2022 मध्ये पडद्यावर झळकलेला मुकुल देव
अभिनेता मुकुल देव 2022 मध्ये 'अँट द एंड' या चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसला होता. टीव्हीवर तो 2018 मध्ये आलेल्या '21 सरफरोश' या सीरिजमध्ये गुल बादशाहच्या भूमिकेत दिसला होता. तर 2020 मध्ये तो ओटीटीवरील 'स्टेट ऑफ सीज: 26/11' या वेब सिरीजमध्ये दिसला होता.
दीपशिखा नागपालनं निधनाचं वृत्त केलं कन्फर्म
मुकुल देव यांची जवळची मैत्रीण दीपशिखा नागपालनं सोशल मीडियावर अभिनेत्याच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला. तिनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर मुकुल देव सोबतचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिनं लिहिलंय, 'RIP'. तसेच, अभिनेत्याच्या मृत्यूच्या बातमीनं चाहते आणि अनेक सेलिब्रिटींना धक्का बसला आहे.
मुकुल देवचा सिनेसृष्टीशी पहिला संबंध तो आठवीत असताना आला. त्यावेळी त्याला आठवीच्या वर्गात पहिला पगार मिळाला. दूरदर्शननं आयोजित केलेल्या एका नृत्य कार्यक्रमात त्यानं मायकल जॅक्सनची नक्कल केलेली. ते इंदिरा गांधी राष्ट्रीय विमान वाहतूक अकादमीचे ट्रेंड पायलट देखील होता.