Mugdha Godbole Kshitee Jog :   मराठी अभिनेत्री-निर्माती क्षिती जोगने (Kshitee Jog) मंगळसूत्र न घालण्यावर केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटू लागले आहेत. क्षिती जोगच्या त्या वक्तव्यावर अश्लील भाषेत कमेंट्स येत असल्याने अभिनेत्री मुग्धा गोडबोलेनी (Mugdha Godbole) संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुग्धाने सोशल मीडियावर घाणेरड्या भाषेत कमेंट करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. एका युट्युब चॅनलला मुलाखत देताना क्षिती जोगने मंगळसूत्र न वापरल्याचे कारण दिले होते.


अभिनेत्री मुग्धा गोडबोलेने 'आरपार' या यु्ट्युब चॅनेलसाठी अभिनेत्री-निर्माती क्षिती जोगची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा एक टीझर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. त्यामध्ये क्षिती जोगने मंगळसूत्र न घालण्याबाबतचा एक किस्सा सांगितला. त्यावरून तिने लग्न झालंय तर फक्त मुलींनाच मंगळसूत्र का घालावं असा प्रश्न केला. क्षितीच्या या व्हिडीओवर अश्लील, शिवीगाळ करणाऱ्या कमेंट्स आल्या. काहींनी क्षिती जोगला संस्कृतीचा दाखला दिला. तर काहींनी तिचे संस्कारही काढले. 






मुग्धाने सुनावले खडे बोल


अभिनेत्री मुग्धा गोडबोलने क्षिती जोगच्या बाजूने भाष्य करताना ट्रोलर्सना खडे बोल सुनावले. इतक्या घाणेरड्या कमेंट्स करणारे पुरुष घरात आपल्या बायकांकडून काय काय अपेक्षा करत असतील? असा सवालही मुग्धाने केला. 


मुग्धा गोडबोलेने आपल्या शोच्या मुलाखतीचा टीझर रिपोस्ट करताना म्हटले की, हे रील नेहमीप्रमाणे मी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. शनिवारी एपिसोड येणार, गुरुवारपासून त्याचं प्रमोशन सुरू होतं. हा व्यवसायाचा भाग आहे. मुद्दा हा आहे की  इन्स्टाग्रामवर ह्या रील खाली साधारण 300 च्या वर कमेंट्स आहेत आणि त्यातल्या बहुतेक पुरुषांच्या असल्याचे मुग्धाने लक्ष वेधले.


या कमेंट्स,  अत्यंत गलिच्छ भाषेत, घाणेरड्या पद्धतीने लिहिलेल्या आणि अश्लील अश्लाघ्य आणि बीभत्स आहेत. आश्चर्य वाटावं का नको असाही आता प्रश्न पडत असल्याचे तिने म्हटले. 


क्षितीच्या पिढीतल्या अनेक बायका रोज घराबाहेर पडताना मंगळसूत्र घालत नाहीत. त्याला अनेक कारणं आहेत. आवडत नाही, चोरांची भीती वाटते वगैरे अनेक. प्रश्न हा आहे की गळ्यात मंगळसूत्र घालावं का नाही हा त्या स्त्रीचा वैयक्तिक प्रश्न असावा का? का नाही? इतक्या बेसिक मुद्द्यावर आपण अजूनही एवढी चर्चा करतो??? इतक्या घाणेरड्या कमेंट्स करणारे पुरुष घरात आपल्या बायकांकडून काय काय अपेक्षा करत असतील? असा सवालही तिने केला. 



आम्ही दैनंदिन मालिकांमध्ये जेव्हा असं काही लिहितो तेव्हा कुठल्या काळात जगता आहात, आता हे प्रश्न नाहीयेत लोकांचे वगैरे म्हणणाऱ्या सगळ्यांना मला सांगावं असं वाटतं की ते कमेंट्स वाचा. काळ बदलला आहे. विचार नाहीत. खूप मोठ्या प्रमाणावर बदललेले नाहीत.कित्येक कॉमेंट्स आम्ही डिलीट केल्या आहेत. कराव्या लागल्या असल्याचेही मुग्धा गोडबोलेने म्हटले.