Mrunal Thakur Deepfake: सोशल मीडियावर आजकाल Aiचा वापर सर्रास केला जातो.यात अनेकदा डीपफेक फोटो व्हीडिओ व्हायरल होताना दिसतात. याचा अनेकदा कलाकारांना मनस्ताप होताना दिसतो. अभिनेत्री मृणाल ठाकूर बाबतीत सध्या असाच प्रकार घडलाय. सोशल मीडियावर ती सक्रीय असून तिच्या कामासंदर्भातील, वैयक्तिक आयुष्यातील अनेक घटना ती शेअर करताना दिसते. यावेळी तिने सोशल मीडियावर तिचा चेहरा आणि ओळख वापरून तयार करण्यात आलेल्या AI डीपफेक व्हिडीओंवर संताप व्यक्त केला आहे. इतकंच नाही, तर अशा प्रकारचं कंटेंट तयार करणाऱ्यांना आणि शेअर करणाऱ्यांना तिने थेट कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला आहे.
डीपफेक तयार करणाऱ्यांना मृणालचा इशारा
इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत मृणालने कोणाचंही नाव न घेता स्पष्ट शब्दांत इशारा दिला. तिने लिहिलं, "माझ्या चेहऱ्याचा वापर करून डीपफेक कंटेंट तयार करणं किंवा तो शेअर करणं बेकायदेशीर आणि अजिबात स्वीकारार्ह नाही. ही माझ्याकडून अधिकृत नोटीस समजा. माझ्या ओळखीचा यापुढे गैरवापर झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल."तिच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर AI डीपफेकचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
AI च्या गैरवापराविरोधात अनेक सेलिब्रिटी आक्रमक
AI तंत्रज्ञानाच्या गैरवापराबाबत आवाज उठवणारी मृणाल ही एकटीच अभिनेत्री नाही. गेल्या काही महिन्यांत अनेक कलाकारांनी त्यांच्या परवानगीशिवाय तयार करण्यात आलेल्या AI-जनरेटेड फोटो, व्हिडीओ आणि आवाजाच्या गैरवापराविरोधात न्यायालयाचं दार ठोठावलं आहे.
या यादीत अक्षय कुमार, वरुण धवन, अनिल कपूर, शिल्पा शेट्टी, प्रीती झिंटा, कार्तिक आर्यन आणि सुनील शेट्टी यांचा समावेश आहे.याआधी अभिनेत्री रश्मिका मंदानाचाही डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावेळी रश्मिकाने ही घटना "अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक" असल्याचं सांगत नागरिक आणि प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घ्यावा, असं आवाहन केलं होतं.
मृणाल ठाकूरच्या आगामी चित्रपटांची उत्सुकता
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, 'डकैत' आणि 'है जवानी तो इश्क होना है' या चित्रपटांना संमिश्र प्रतिसाद मिळाल्यानंतर मृणाल आता दिग्दर्शक ॲटली कुमार यांच्या आगामी ॲक्शन-ड्रामा चित्रपट 'राका'मध्ये झळकणार आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन, दीपिका पदुकोण आणि रश्मिका मंदाना यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली, तरी माध्यमांतील वृत्तांनुसार हा चित्रपट डिसेंबर 2027मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
