Purushottam Berde : नुकताच14 वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह आणि विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृद‌्‌गंध पुरस्कार’ सोहळा ठाणे येथील काशिनाथ घाणेकर सभागृहात रंगला. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच पुरुषोत्तम बेर्डे (Purushottam Berde) यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इतर मृदगंध पुरस्कार विजेत्यांमध्ये सुरेखा पुणेकर (लोककला), सुरेश  सावंत ( सामाजिक क्षेत्र),आदेश बांदेकर (अभिनय व सूत्रसंचालन), सुचित्रा बांदेकर (अभिनेत्री आणि निर्माती), रोहित राऊत (नवोन्मेष प्रतिभा-संगीत क्षेत्र),दीपाली देशपांडे (क्रीडा क्षेत्र) ज्ञानेश महाराव  (लेखक व पत्रकार ) यांना ‘मृद‌्‌गंध पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. 


‘माझ्या कारकिर्दीच्या सुवर्णमहोत्सवी टप्प्यावर हा पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण असल्याचं पुरुषोत्तम बेर्डे यांनी यावेळी म्हटलं. आपली लोकसंगीताच्या अनुभवाची शिदोरी वेगवेगळ्या कार्यक्रमांतून सादर करत महाराष्ट्र शिरोमणी शाहीर विठ्ठल उमप यांनी लोककलेची परंपरा जपत समाजप्रबोधनासह जनजागृतीचा प्रयत्न सातत्याने केला. आपलं संपूर्ण आयुष्य लोककलेसाठी समर्पित करणाऱ्या संगीत नाटक अकादमी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘मृद‌्‌गंध पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते. 


पुरुषोत्तम बर्डे यांनी काय म्हटलं?


‘माझ्या कारकिर्दीच्या सुवर्णमहोत्सवी टप्प्यावर हा पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे.’ कार्यरत असताना मिळालेला हा जीवनगौरव अजून चांगले काम करायला बळ देणारा असल्याचं प्रतिपादन लेखक-दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी विठ्ठल उमप फाऊंडेशनच्या प्रतिष्ठेच्या ‘मृद‌्‌गंध पुरस्कार’ वितरण प्रसंगी केले. ‘खंडोबाचं लगीन’ या नाटकादरम्यान लोकशाहीर विठ्ठल उमप यांची ओळख झाली आणि आज त्या नाटकातील काही मंडळीच्या साक्षीने हा पुरस्कार मिळतोय हा वेगळा आनंद सुद्धा आहे. अतिशय  दृष्ट लागण्यासारखा हा सोहळा आयोजित केल्याबद्दल नंदेश उमप आणि सरिता उमप यांचे मनापासून कौतुक करत पुरुषोत्तम बेर्डे यांनी या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.     


या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या की, ‘ज्यांनी आपल्या कलेतून  रसिकांना आनंद दिला त्यांची आठवण आज त्यांची मुलं ठेवतायेत हे खरंच खूप कौतुकास्पद आहे.’ जयराज साळगावकर (संपादक,  कालनिर्णय), श्री. संदिप माळवी (अतिरिक्त आयुक्त, ठाणे) आदी मान्यवर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते ‘मृद‌्‌गंध पुरस्कार’ देण्यात आले. शाल,पुष्प पुस्तक, मानपत्र व विठ्ठल उमपांची प्रतिकृती असलेले मानचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी दत्ता भाटकर, गणेश धाडसे, अमृत कांबळे, पुंडलिक सानप, अनिल आरोसकार या रंगमंच कामगारांना अर्थसहाय्य देण्यात आले.  


ही बातमी वाचा : 


Shubhavi Gupte : अशोक सराफांच्या मालिकेतून मराठी स्टारकीडचं इंडस्ट्रीत पदार्पण; अभिनेत्री लेकीसाठी झाली भावूक, म्हणाली...