Most Unlucky Song: बॉलिवूड चित्रपटांपेक्षा (Bollywood Movies) त्यातील गाण्यांच्या चर्चा जास्त रंगतात. कोणताही समारंभ असो किंवा लग्नाची वरात नाहीतर मग छोटी-मोठी पार्टी बॉलिवूडच्या गाण्यांवर थिरकल्याशिवाय काही मजाच येत नाही. बॉलिवूड गाण्यांव्यतिरिक्त (Bollywood Songs) के-पॉप, अमेरिकन पॉप सॉन्ग यांसारखे असंख्य गाण्याचे प्रकार आहेत आणि जगभरात त्यांचे चाहतेही आहेत. कधी आपण उदास असो किंवा कुणाची आठवण येवो, प्रत्येकाची गाण्यांची आवड वेगळी असते... काहींना रॉक सॉन्ग, पॉप सॉन्ग आवडतात, तर काहींना जुनी, शांत गाणी आवडतात. बऱ्याचदा गाण्यांमुळे मूड चांगला होतो. अनेकांना तर गाणी ऐकता ऐकता शांत झोपही लागते. पण, गाणं ऐकल्यानंतर आत्महत्या करावीशी वाटते, असं तुम्ही कधी ऐकलंय का? 1933 मध्ये एक असं गाणं रिलीज झालेलं, जे ऐकून आत्महत्या करावीशी वाटायची. रेझसो सेरेस नावाच्या एका संगीतकारानं 'ग्लूमी संडे' नावाचं एक गाणं लिहिलेलं, पण हे गाणं ऐकल्यानंतर आत्महत्या करावीशी वाटायची.
रेझसो सेरेसची गर्लफ्रेंड त्याला सोडून गेल्यानंतर, त्यानं हे गाणं लिहिलं. पण, त्या गाण्याचे बोल एवढे दुःखी होते की, ते ऐकल्यानंतर मन अगदी दुःखी होऊन जायचं. उदास उदास वाटायचं... असं सांगितलं जातं की, हे गाणं अगदी काळीज पिळवटणारं होतं. यामुळेच या गाण्याला 'हंगेरियन सुसाइड सॉन्ग' असं नाव ठेवण्यात आलेलं.
'या' गाण्यामुळे 100 जणांनी जीव गमावला
सुरुवातीला अनेकांनी 'ग्लूमी संडे' रेकॉर्ड करण्यास नकार दिला. पण, नंतर 1935 मध्ये हे गाणं रेकॉर्ड करून रिलीज करण्यात आलं. हे गाणे रिलीज होताच, हंगेरीमध्ये आत्महत्या करणाऱ्यांची संख्या अचानक वाढू लागली. बऱ्याच प्रकरणांमध्ये, हे गाणं लोकांनी ऐकल्याचं आढळून आलं किंवा त्यांच्या सुसाईड नोटमध्ये हे गाणं नमूद करण्यात आलं होतं. मिडिया रिपोर्टनुसार, सुरुवातीला या गाण्यामुळे सुमारे 17 जणांना आपला जीव गमवावा लागला. नंतर ही संख्या 100 च्या जवळ पोहोचली. परिस्थिती इतकी बिकट झाली की 1941 मध्ये सरकारला या गाण्यावर बंदी घालावी लागली.
62 वर्षांनंतर बंदी उठवली, गायकाने आत्महत्या केली
सुमारे 62 वर्षांनंतर, म्हणजे 2003 मध्ये, या गाण्यावरील बंदी उठवण्यात आली. पण तोपर्यंत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. हे गाणे ऐकल्यानंतर रेझसो सेरेसच्या मैत्रिणीनंही आत्महत्या केली. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, रेझसो सेरेसनंही त्याच्या मृत्यूसाठी तोच दिवस निवडला, ज्याचा गाण्यात उल्लेख होता, म्हणजेच रविवार... जानेवारी 1968 मध्ये बुडापेस्टमध्ये रेझसो सेरेसनं आत्महत्या केली. सर्वात आधी त्यानं खिडकीतून उडी मारून जीव घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्यानंतर मात्र हॉस्पिटलमध्ये दाखल असताना त्यानं वायरच्या मदतीनं गळफास घेतला.
'ग्लूमी संडे' नावाची फिल्मही आलेली
'हंगेरियन सुसाइड सॉन्ग' ज्या गायकानं गायलं, त्याच्या आवाजातही एवढं दुःख होतं की, जो कोणी ते गाणं ऐकेल तो थेट रडायला सुरुवात करायचा. तरीसुद्धा हे गाणं 28 भाषांमध्ये 100 हून जास्त गायकांनी गायलं. यामध्ये सर्वात प्रसिद्ध झालेलं वर्जन 'बिली हॉलिडे'नं इंग्रजीत गायलेलं, जे नंतर बॅन करण्यात आलं. या गाण्याच्या कथेवर आधारित 'ग्लूमी संडे' हा चित्रपट 1999 मध्ये हंगेरी आणि जर्मनीमध्येही प्रदर्शित झाला होता.