Mohanlal Mother Passed Away: मनोरंजन विश्वातून सध्या एक दुःखद बातमी समोर येत आहे. मल्याळम चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि नुकतेच दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित झालेले अभिनेते मोहनलाल यांच्या आई शांताकुमारी यांचं मंगळवारी निधन झालं. त्या 90 वर्षाच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून वृद्धापकाळशी संबंधित आजार आणि न्यूरोलॉजिकल समस्यांशी त्या झुंज देत होत्या. कोचीतील एलमक्करा भागात असलेल्या मोहनलाल यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बराच काळ त्या घरी उपचार घेत होत्या.  आईच्या जाण्याने मोहनलाल यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.  मोहनलाल यांचा आईवर अतिशय प्रेम होतं. अत्यंत व्यस्त कामकाज असल्यानंतरही ते आवर्जून आईचे काळजी घेण्यासाठी वेळ काढायचे. आईचा निधनाची बातमी समजताच चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि चाहत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे. 

Continues below advertisement

आई मुलाचं अतूट नातं 

मोहनलाल यांनी अनेकदा आपल्या आयुष्यात आईचे स्थान आणि तिच्या पाठिंबाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारतानाही त्यांनी हा सन्मान आपल्या आईला डेडिकेट करत हे अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा असल्याचं म्हटलं होतं. आपल्या अभिनय कारकीर्दीतील यशामागे आईचं निस्वार्थ पाठबळ आणि प्रोत्साहन हेच सर्वात मोठं कारण असल्याचं मोहन लाल अनेकदा सांगतात. 

शांताकुमारी अम्मा असं त्यांना सगळे म्हणायचे. स्वभावाने अत्यंत शांत असलेल्या मोहनलाल यांच्या आई शांता कुमारी अम्मा यांनी सार्वजनिक आयुष्यपासून कायम एक अंतर राखलं. त्यांचा धाकटा मुलगा भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात मोठा सुपरस्टार असतानाही त्या प्रसिद्धीपासून दूर होत्या. मोहनलाल यांना जवळून ओळखणार्यांच्या मते, मोहनलाल यांच्यासाठी त्यांची आई एक शांत स्थिर आणि प्रेरणादायी आधार आहेत. मोहनलाल यांच्या आई शांताकुमारी अम्मा यांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.