Mithun Chakraborty Health Update : 'मिथून यांची प्रकृती आता स्थिर असून ते 100 टक्के बरे आहेत. तसेच हे त्यांचे रुटीन चेकअप होतं', अशी माहिती देखील मिथून चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांच्या मुलगा मिमोह चक्रवर्ती याने दिली आहे. अभिनेते मिथून चक्रवर्ती यांची प्रकृती खराब झाल्याची माहिती समोर आली होती. तसेच कोलकाता येथील अपोलो या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना ब्रेनस्ट्रोक झाल्याची माहिती एबीपी माझाला देण्यात आली होती.
सुरुवातीला छातीत दुखू लागल्यामुळे आणि अस्वस्थ वाटू लागल्यामुळे मिथून यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मिथून यांचं सध्या वय हे 73 वर्ष आहे. शनिवार 10 फेब्रुवारी रोजी मिथून यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सकाळी अचानक त्यांना छातीत दुखणं सुरु झालं. आणखी कोणता त्रास होण्याआधी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती देण्यात आली होती.
रुग्णालयाकडूनही कोणतीही माहिती नाही
छातीत दुखू लागल्यामुळे मिथून यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान रुग्णालयाकडूनही अद्याप त्यांच्या प्रकृतीविषयीही कोणतीही अपडेट देण्यात आली नाहीये. तसेच रुग्णालयाकडून लवकरच त्यांच्या प्रकृतीसंदर्भात हेल्थ बुलेटीन जारी करण्यात येणार आहे.
मिथून चक्रवर्ती पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित
मिथून चक्रव्रर्ती यांना पद्म भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेले पद्म भूषण आणि पद्म विभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. या पुरस्कारबद्दल आनंद व्यक्त करत, हा बहुमान मिळाल्याने मी अत्यंत आनंदी आहे, अशी प्रतिक्रिया मिथून यांनी दिली. मी खरंतर सगळ्यांनाचे आभार मानू इच्छितो. मी स्वत:साठी कोणाकडे कधी काही मागितलं नाही, पण मला न मागताच बऱ्याच गोष्टी मिळाल्या आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा एक अविस्मरणीय आनंद आहे.