Mi Sansar Majha Rekhite: मराठी मालिकांमध्ये आई कुठे काय करते मालिकेने टीआरपीचे सगळे रेकॉर्ड मोडले. मालिकेतील अरुंधतीसह सगळीच पात्र प्रेक्षकांच्या मनात भरली. गेल्या काही वर्षांपासून मराठी मालिकांमध्ये सोशिक अभिनेत्रींचा ट्रेंड कायम दिसत असताना साधारण तसाच ढाचा असणाऱ्या मालिका आल्या.  कधी पौराणिक मालिका, तर कधी नातेसंबंधांच्या चौकटीत अडकलेल्या स्त्रीवादी भूमिकांपलीकडे फारशी झेप मराठी मालिकांमध्ये दिसली नाही.  टीआरपीचं  गणित साध्य करण्यासाठी अलीकडेच सन मराठी वाहिनीवर ' मी संसार माझा रेखीते'  (Mi Sansar Majha Rekhite) या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली.  एक डिसेंबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या मालिकेचे प्रोमो प्रदर्शित केले जात आहेत. यावर प्रेक्षकांचं मात्र संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. ही सिरीयल ' आई कुठे काय करते' सारखीच वाटत असल्याचं काही प्रेक्षक म्हणत आहेत. (Marathi Serial)

Continues below advertisement

मी संसार माझा रेखिते मालिकेचा प्रोमो 

मी संसार माझा रेखीते या मालिकेत अभिनेत्री दीप्ती केतकर अनुप्रिया ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहे.  सन मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये या मालिकेची झलक दाखवली आहे.  यात उकळता चहा, रेडिओवर लागलेला कार्यक्रम आणि एका बाजूला स्वयंपाकाची तयारी करताना  अनुप्रिया. लांबसडक वेणी गळ्यात मंगळसूत्र आणि साडी या विषयात चहाचे कप भरून डायनिंग टेबलवर बसलेल्या कुटुंबातील सदस्यांना ती चहाचा कप देते. प्रत्येकाच्या मनासारखं वागण्याचा प्रयत्न करणारी ही सून नवऱ्याकडून आणि सासूकडून होणारा अपमान सराईतपणे गिळते. गृहिणी असल्याने की सगळा अपमान सहन करते. कोणालाही उलटून बोलत नाही असे काहीसे कथानक या प्रोमोमधून समोर येत आहे. 

या प्रोमोचे काही प्रेक्षकांनी स्वागत केले आहे, तर काहींनी किती दिवस एकाच पठडीतलं कथानक सुरू ठेवणार? असा प्रश्नही काहींनी केला आहे. या प्रोमोवर एका प्रेक्षकाने लिहिले, " तुम्ही खूप छान आहात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सगळेच ऍक्टर्स खूप छान घेतले आहेत. पण आपण किती दिवस याच वर्तुळ मध्ये अडकणार आहोत हा प्रश्न आहे. सगळ्यांनी मोडायचा आणि बाई ने जोडून ठेवायचा. म्हणजे संसार मध्ये फक्त बाई नेच जोडून ठेवायचा अशा पद्धतीच्या serials का येत आहेत. जग आत्ता कुठे थोडं बदलायला लागले आहे. आपण सारखे सारखे असं पद्धतीच्या serials आणून हे दर्शवीत आहोत का कि बायकांनी अजून सुद्धा असच अपमान सहन करत जोडून ठेवला पाहिजे. नवऱ्याचं मान सन्मान हा ठेवलाच पाहिजे. आपली संस्कृती च आहे ती. आपण आपल्या जोडीदार साठी खूप काही केले पाहिजे आणि करावे. पण हे काय आहे? जोडीदाराने त्याचे थोडे सुद्धा भान न ठेवता फक्त आपटा ढोपटी करावी हा कुठला न्याय आहे?"

तर दुसऱ्या एका प्रेक्षकाने हरीश आणि दीप्ती ही जोडी चांगली असल्याचं म्हणत या सिरीयलचे स्वागत केले आहे. किती दिवस हे असंच दाखवणार काहीतरी चांगलं दाखवा ज्याने समाज सुधारेल असं एका दुसऱ्या प्रेक्षकाने लिहिले आहे. 

आई कुठे काय करते मालिकेतून मनोरंजन 

आई कुठे काय करते या मालिकेतील मधुराणी प्रभुलकरच्या अरुंधती भूमिकेने पाच वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत गेल्यावर्षी स्टार प्रवाहवरून निरोप घेतला. नवरा सासूचा अपमान करणारी सोशिक आई आणि नंतर स्वतःच्या क्षमता ओळखून सक्षम झालेली अरुंधती प्रेक्षकांना चांगलीच भावली. आता मी संसार माझा रेखिते या मालिकेमधूनही तशीच गोष्ट समोर येणार आहे. या गोष्टीची कहाणी तशीच असेल की काही वेगळे कथानक असेल हे मात्र मालिका सुरू झाल्यानंतरच स्पष्ट होईल.