Mardini Teaser, Prarthana Behere: मराठी चित्रपटसृष्टीत (Film Industry) सध्या आशय, भावना आणि वास्तववादी कथानकांचा प्रभाव अधिक ठळकपणे जाणवत आहे. प्रेक्षकांना केवळ मनोरंजन नव्हे, तर अंतर्मुख करणाऱ्या आणि भावनिक स्तरावर भिडणाऱ्या कथा अनुभवायच्या आहेत. अशाच तीव्र भावविश्वाला स्पर्श करणारा 'मर्दिनी' (Mardini Movie) हा मराठी चित्रपट (Marathi Movie) आता प्रेक्षकांच्या भेटीस येत असून, चित्रपटाचा बहुप्रतिक्षित टीझर 26 मे रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. पोस्टर लॉन्चनंतर प्रेक्षकांना लागलेली उत्सुकता आता टीझर लॉन्चनंतर अधिक वाढली असून, सोशल मीडियावर आणि चित्रपटवर्तुळात 'मर्दिनी'ची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

Continues below advertisement

श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) प्रस्तुत, ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि ओ डी आय ग्रुप निर्मित 'मर्दिनी' हा चित्रपट केवळ स्त्रीशक्तीचा गौरव करणारा नाही, तर एका आईच्या अंतर्मनातील वेदना, माया, असहायता, संताप आणि संघर्ष यांचा भावनिक प्रवास मांडणारा सिनेमा असल्याचे टीझरमधून स्पष्टपणे जाणवत आहे. “आई तारी तिला कोण मारी” या प्रभावी ओळींमधून चित्रपटाचा आशय प्रकर्षाने समोर येतो. लेकरांवर संकट आल्यानंतर एक सामान्य स्त्री परिस्थितीविरोधात कशी उभी राहते आणि आपल्या मुलांच्या रक्षणासाठी स्वतःचं रौद्र रूप कसं धारण करते, याची अस्वस्थ करणारी झलक या टीझरमध्ये पाहायला मिळते.

प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये गडद आणि वास्तववादी दृश्यभाषेचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. शांततेतून हळूहळू वाढत जाणारा तणाव, अंगावर शहारे आणणारं पार्श्वसंगीत, भावनांना भिडणारे संवाद आणि आईच्या मनात सुरू असलेली घालमेल यामुळे हा टीझर केवळ प्रमोशनल झलक न राहता, चित्रपटाच्या भावविश्वात घेऊन जाणारा अनुभव ठरत आहे. 

Continues below advertisement

टीझरमध्ये अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिचा आतापर्यंत कधीही न पाहिलेला दमदार अवतार पाहायला मिळत आहे. तिच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या भावना, डोळ्यांतील संताप आणि लेकरांसाठीची असहाय तगमग प्रेक्षकांना भावनिकरीत्या जोडून ठेवते. अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी आणि राजेश भोसले यांच्या व्यक्तिरेखांची झलकही कथेला अधिक गूढ आणि उत्कंठावर्धक बनवणारी ठरत आहे. बालकलाकार मायरा वैकुळ हिची उपस्थिती कथेला भावनिक गहिरेपणा देणारी ठरणार असल्याचेही या टीझरमधून जाणवत आहे.

अजय मयेकर दिग्दर्शित 'मर्दिनी' हा त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट असून, पहिल्याच चित्रपटात त्यांनी भावना, थरार आणि नारीशक्तीचा प्रभावी संगम साधल्याची चर्चा सुरू झाली आहे. निर्माती दिप्ती तळपदे यांच्या निर्मितीखाली साकारत असलेल्या या चित्रपटात सहनिर्माती टिना राकेश कोठारी, छायांकन शब्बीर नाईक, संकलन अभिषेक शेठ, संगीत हितेश मोडक तसेच पटकथा आणि संवाद महाबळेश्वर नार्वेकर यांनी चित्रपटाच्या तांत्रिक बाजूला भक्कम आधार दिला आहे.

'मर्दिनी'च्या टीझर लॉन्चनंतर आता चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली असून, सोशल मीडियावर टीझरमधील संवाद, दृश्यरचना आणि प्रार्थना बेहेरेच्या दमदार भूमिकेची जोरदार चर्चा सुरू आहे. मातृत्व, संघर्ष, प्रेम आणि अन्यायाविरोधात उभ्या राहणाऱ्या एका आईची ही कथा प्रेक्षकांना भावनिक आणि अंतर्मुख करणारा अनुभव देणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. नारीशक्तीच्या सामर्थ्याला सलाम करणारा 'मर्दिनी' हा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट 3 जुलै 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

पाहा मर्दिनीचा टीझर:

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Governor trailer Out: मनोज वाजपेयींच्या ‘गव्हर्नर’च्या जबरदस्त ट्रेलरची प्रचंड चर्चा ; 2 मिनिट 54 सेकंदांचा थरार पाहून प्रेक्षक थक्क

ABP माझाच्या बातम्या LIVE...