Marathi Serial: अलिकडच्या काळात मराठी छोट्या पडद्यावरील मालिकांकडे पाहणाऱ्या प्रेक्षकसंख्येत फारशी वाढ होताना दिसत नाही. उलट अनेक मालिका अपेक्षेप्रमाणे टीआरपी मिळवू शकत नसल्याचं चित्र सध्या स्पष्ट होत आहे. मालिकांमधील कथा आणि पात्रांशी प्रेक्षक जोडले जात असले, तरी कथानकातला कंटाळवाणा प्रवास किंवा वेळापत्रकातील बदल याचा थेट फटका टीआरपीला बसतो. त्यामुळेच आजकाल अनेक दैनंदिन मालिका काही महिन्यांतच बंद पडताना दिसत आहेत. ज्या मालिकांचा टीआरपी स्थिर किंवा घसरलेला असतो, त्यांचं भवितव्य लवकरच ठरतं.

काही मालिकांची वेळ बदलली

अशातच स्टार प्रवाहवरील एका लोकप्रिय मालिकेबाबत बंद होण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. येत्या 5 जानेवारीपासून स्टार प्रवाह वाहिनीवर ‘मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ ही नवी मालिका सुरू होणार आहे. मधुराणी प्रभुलकर आणि अमोल कोल्हे यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही मालिका दररोज सायंकाळी 7.30 वाजता प्रसारित केली जाणार आहे. या नव्या मालिकेसाठी वाहिनीने आपल्या प्राइम टाइम स्लॉटमध्ये बदल केले असून रेश्मा शिंदेची ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका आता रात्री 10.30 वाजता हलवण्यात आली आहे.

होतीस तू काय झालीस तू मालिकेबाबत संभ्रम

मात्र, याच वेळेत आधीपासूनच गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ ही मालिका सुरू आहे. त्यामुळे या मालिकेचं पुढे काय होणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सोशल मीडियावरही यासंदर्भात चर्चा रंगू लागल्या आहेत. या सगळ्या चर्चांदरम्यान मालिकेतील मुख्य अभिनेत्रीने दिलेली प्रतिक्रिया सध्या विशेष लक्ष वेधून घेत आहे. तथापि, वाहिनीकडून अद्याप यावर कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

गिरीजा प्रभूची पोस्ट चर्चेत

‘कोण होतीस तू काय झालीस तू’ ही मालिका 28 एप्रिल 2025 रोजी सुरू झाली होती. कावेरी आणि यश यांची प्रेमकथा या मालिकेचा केंद्रबिंदू होती. मात्र अवघ्या आठ महिन्यांतच ही मालिका लवकरच पडद्याआड जाणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. या मालिकेत कावेरी धर्माधिकारी ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री गिरीजा प्रभूने सोशल मीडियावर दिलेल्या संकेतामुळे या चर्चांना दुजोरा मिळत असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे मालिकेच्या चाहत्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.