Marathi Serial: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'लपंडाव' मध्ये सध्या लग्नाचा जल्लोष सुरू आहे. मालिकेत सखी आणि कान्हाच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली असून संपूर्ण मालिकेत आनंदाचं वातावरण आहे. पण लग्नाआधी या जोडीने केलंय काहीसं खास आणि हटके असं काही एक जबरदस्त प्री-वेडिंग फोटोशूट!
सखी कान्हाच्या शूटला ग्लॅमरस टच
हे फोटोशूट पार पडलं भव्य आणि दिमाखदार सिनेसिटी स्टुडिओमध्ये, जिथे जगभरातील प्रसिद्ध स्थळांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे सखी-कान्हाच्या या शूटला मिळाला एक वेगळाच ग्लॅमरस आणि सिनेमॅटिक टच. मराठी मालिकांच्या दुनियेत ही एक अनोखी संकल्पना ठरली आहे, कारण मालिकेच्या कथानकात प्री-वेडिंग शूट असा प्रयोग प्रथमच करण्यात आला आहे.
या मालिकेत सखी आणि कान्हाची भूमिका साकारत आहेत गुणी कलाकार चेतन वडनेरे आणि कृतिका देव. वास्तव जीवनात दोघांचं प्री-वेडिंग फोटोशूट झालेलं नसल्यामुळे हा अनुभव त्यांच्यासाठी अगदी नवा आणि खास होता. त्यांनी सांगितलं की, “हा दिवस आमच्यासाठी संस्मरणीय ठरला. नेहमीच्या शूटिंगच्या गडबडीतून थोडा वेगळा आणि मजेशीर अनुभव मिळाला.”
सखी कान्हाचे तीन वेगवेगळे लूक
या शूटदरम्यान सखी आणि कान्हाने तीन वेगवेगळे लूक साकारले पारंपरिक, आधुनिक आणि फ्युजन स्टाईलमध्ये. पारंपरिक लूकमध्ये सखीने नऊवारी साडी आणि दागदागिने परिधान केले, तर कान्हा क्लासिक मराठमोळ्या पोशाखात दिसला. आधुनिक लूकमध्ये दोघांनी स्टायलिश आणि ट्रेंडी कपड्यांमध्ये एकदम हटके अंदाज दाखवला. फ्युजन लूकमध्ये मात्र पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देत त्यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. सिनेसिटी स्टुडिओमधील विविध लोकेशन्सवर घेतलेल्या या शूटमध्ये प्रत्येक फ्रेम मोहक दिसते. फोटोशूटचा प्रत्येक क्षण आनंदाने आणि उत्साहाने भरलेला होता. चेतन आणि कृतिका म्हणाले, “मालिकेतील हे प्री-वेडिंग शूट करताना खूप धमाल आली. संपूर्ण टीमसोबत हा दिवस एकदम भन्नाट गेला.”
कथानकाला नवा रंग
लपंडाव मालिकेने नेहमीच प्रेक्षकांना नव्या गोष्टींची भेट दिली आहे आणि यावेळीही प्रेक्षकांसाठी काहीतरी वेगळं घेऊन आली आहे. सखी-कान्हाचं हे हटके प्री-वेडिंग फोटोशूट मालिकेच्या कथानकाला नवा रंग आणि उत्साह देणार आहे. तर विसरू नका पाहायला लपंडाव, दुपारी २ वाजता, फक्त स्टार प्रवाहवर कारण सखी-कान्हाचं प्रेम, लग्न आणि हा खास प्री-वेडिंग फोटोशूट तुमचं मन नक्कीच जिंकेल!