मुंबई : 'स्ट्रगलर साला' या सिरिजला सध्या बरची पसंती मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये कुशल बद्रिके (Kushal Badrike), संतोष जुवेकर (Santosh Juvekar) आणि अभिजीत चव्हाण (Abhijeet Chavan) हे त्रिकूट पाहायला मिळत आहे. तसेच य़ाचे दिग्दर्शन आणि लेखन हे विजू माने (Viju Mane) यांनी केलंय. याविषयी आणि या तिघांच्याही प्रवासाविषयी विजू माने यांनी सौमित्र पोटे यांच्या 'मित्र म्हणे' या पॉडकास्टमध्ये अनेक आठवणी आणि किस्से सांगितले. तसेच त्यांनी कुशल बद्रिकेच्या स्ट्रगलविषयी देखील सांगितलं आहे. 



या मुलाखतीदरम्यान विजू माने यांनी कुशल बद्रिकेचा एक भावनिक प्रसंग सांगितला आहे. यावर त्यांनी म्हटलं की, स्ट्रगल हे प्रत्येकाचंच आहे. पण कुशलचं स्ट्रगल हे सर्वात जास्त आहे. ज्या आर्थिक परिस्थितीमध्ये तो होता आणि आता ज्या आर्थिक परिस्थितीमध्ये तो आहे, यामध्ये कुशलची मेहनत आहे. काम मिळवण्यासाठी त्याने केलेली धडपड, त्याच्या बायकोने दिलेली साथ हा कुशलचा प्रवास हा खूप हृदयद्रावक आहे. खूप त्याच्या गोष्टी अशा आहेत. 


कुशलच्या एकांकिकेचा प्रसंग


  एकदा कुशलची एकांकिका आहे, म्हणून मी पाहायला गेलो होतो. एकांकिका सुरु झाली आणि कुशलचा दोन पाच मिनिटांचा अॅक्ट पण झाला, ब्लॅकआऊट झाला. त्यानंतर तो दुसऱ्या विंगेतून बाहेर आला. दीड मिनिटांनी माझ्या लक्षात आलं की, कुशलच्या खांद्यावर जो टॉवेल होतो तो तोंडाला लावून तो काहीतरी करतोय. काहीतरी गडबड आहे हे माझ्या लक्षात आलं. बारकाईने पाहिल्यावर लक्षात आलं की त्याच्या तोंडातून रक्त येतंय. गडकरी रंगायतनला एका विंगेतून दुसऱ्या विंगेत येताना तो एका खांबावर आपटला आणि त्याचे दोन दात निखळून पडले. भळाभळा त्याच्या तोंडातून रक्त वाहत होतं. ते रक्त तो त्या रुमालाने बंद करायचा आणि वाक्य बोलयचा. असं करत त्याने पुढची 35 मिनिटं एकांकिका केली आणि समोरच्याला लक्षात पण आलं नाही, की त्याला असं काहीतरी होतंय. अभिनेता म्हणूनही त्याचं स्ट्रगल खूप वेगळं आहे, असं विजू माने यांनी म्हटलं.  


अभिजीत चव्हाण उत्तम अभिनेत्यांपैकी एक - विजू माने


अभिजीत चव्हाण हा मी पाहिलेल्या एका उत्तम अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचं विनोदाचं टायमिंग अत्यंत चांगलं आहे, तो जबरदस्त गंभीर भूमिका करु शकतो. पण त्याला त्याच्या ताकदीचा रोल अजूनही मिळालेला नाहीये. तो आम्हीही देऊ शकलेलो नाही. पण हा प्रत्येकाचा नशिबाचा भाग असतो, असंही विजू माने यांनी म्हटलं आहे.   


ही बातमी वाचा : 


Viju Mane : दिग्दर्शक म्हणून मराठी सिनेमा माझी आर्थिक गरज भागवू शकत नाही; दिग्दर्शक विजू मानेंची स्पष्टोक्ती