Kedar Shinde Post On Hindi Language Compulsion: मराठी (Marathi Language) विरुद्ध हिंदी (Hindi Language) असा वाद महाराष्ट्रात (Maharashtra) खासकरून मुंबईत अनेकदा उफाळून येतो. त्याला मराठीवर होणाऱ्या हिंदीच्या आक्रमणाची किनार असते. पण आता महाराष्ट्रात मुलांना पहिल्या इयत्तेपासूनच हिंदी शिकावी लागणार आहे. 'राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024'नुसार मराठी आणि इंग्रजीसोबतच पहिलापासूनच हिंदीचेही (Hindi Language Compulsion) धडे गिरवावे लागणार आहेत. सध्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांत चौथीपर्यंत दोन भाषा आहेत. आता मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांत पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी तृतीय भाषा असेल, असा निर्णय शासनानं घेतला आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाचा राज्यातल्या नागरिकांकडून कडाडून विरोध केला जातोय. महाराष्ट्रात मराठी ही मुख्यभाषा आहे. ती असताना हिंदीची सक्ती का? असा सवाल सगळीकडून विचारला जातोय. 

Continues below advertisement


एकीकडे शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदी सक्तीविरोधात आक्रमक झाले आहेत. तर, त्यासोबतच अनेक साहित्यिक आणि सेलिब्रिटीही हिंदी सक्तीचा कडाडून विरोध करत आहेत. अशातच मराठीतले प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी हिंदी सक्तीविरोधात खरमरीत पोस्ट लिहून आपला निषेध व्यक्त केला आहे. केदार शिंदे यांनी पोस्ट लिहून ठेट मर्मावरच बोट ठेवल्याचं दिसतंय. 


केदार शिंदेंची हिंदी सक्तीच्या निषेधार्थ पोस्ट 


दिग्दर्शक केदार शिंदे यांनी हिंदी सक्तीविरोधात खरमरीत पोस्ट लिहिली आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत म्हटलंय की, "ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ...' यात पहिली ते चौथीच्या बाळांना कन्फ्युज करू नका.... त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगू द्या." या पोस्ट सोबत त्यांनी कॅप्शनमध्ये "हिंदी सक्ती नकोच, जय महाराष्ट्र!" 






दरम्यान, दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासोबतच इतरही अनेक मराठी सेलिब्रिटींनी हिंदी सक्तीचा निषेध करत आपलं मत मांडलं आहे. मकरंद देशपांडे यांनी पहिलीपासून हिंदी नकोच, अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. तसेच, मराठी अभिनेता वैभव मांगलेनं मुंबईत मराठीची वाट लागलीय, असं म्हणत हिंदी सक्तीची नकोच, असं सांगत मराठी भाषेबाबत काळजी व्यक्त केली आहे. तर, याव्यतिरिक्त हेमंत ढोमे, सयाजी शिंदे, किरण माने, सोनाली कुलकर्णी तेजस्विनी पंडित, पल्लवी वैद्य यांसारख्या मराठी कलाकारांनीही आपापल्या भूमिका मांडल्या आहेत. 


राष्ट्रीय शिक्षण धोरणात तीन भाषा सूत्र


हिंदीवरून राजकारण सुरू झालं असलं तरी खरा मुद्दा आहे तो पहिलीपासून त्रिभाषा सूत्राचा. सरकारनं नव्या शैक्षणिक धोरणावर बोट ठेवत शाळांमध्ये तीन भाषा शिकवण्याचा निर्धार दाखवून दिलाय. पण त्यावरूनच राज ठाकरेंनी सरकारला धारेवर धरलंय. पहिल्या इयत्तेपासून विद्यार्थ्यांवर तीन भाषांचं ओझं लादायचं का, हा प्रश्न यानिमित्तानं ऐरणीवर आलाय.


महाराष्ट्र सरकारच्या नव्या जीआरनुसार राज्यातल्या विद्यार्थ्यांना आता दोनऐवजी तीन भाषा शिकाव्या लागणार आहेत. मराठी आणि इंग्रजीच्या जोडीला तिसऱ्या भाषेसाठी हिंदीसोबतच इतर भारतीय भाषा शिकण्याचे पर्याय आहेत. पण तिसऱ्या अधिकच्या भाषेचा भार विद्यार्थ्यांवर कशासाठी यावरून वाद पेटलाय.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Ghanshyam Darode Refutes Death Rumors: 'येत्या 10 दिवसांत मी स्वतःला संपवणार...'; छोटा पुढारी घनःश्याम दरोडेचा थेट पोलिसांना इशारा, प्रकरण नेमकं काय?