'संयम ठेवला, पण अजूनही माझे 6,70,151 रुपये थकवलेत...'; 'वादळवाट' फेम दिग्दर्शक मंदार देवस्थळींवर गंभीर आरोप
Marathi Director Amit Chhallare On Mandar Devasthali: मराठीतील गाजलेली मालिका 'वादळवाट' फेम दिग्दर्शक मंदार देवस्थळींवर पैसे थकवल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

Marathi Director Amit Chhallare On Mandar Devasthali: मराठी अभिनेता शशांक केतकर (Marathi Actor Shashank Ketkar) आणि अभिनेत्री मृणाल दुसानिस (Actress Mrunal Dusanis) यांची 2019 मध्ये आलेली मालिका 'हे मन बावरे' (He Man Baware) विशेष गाजली. दोघांची जोडी प्रेक्षकांना खूपच भावली. पण, या मालिकेन 2020 मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण, आज मालिका बंद होऊन कित्येक वर्ष लोटल्यानंतरही आजही दिग्दर्शकांनी पैसे न दिल्याचा आरोप निर्माते-दिग्दर्शक मंदार देवस्थळींवर (Mandar Devasthali) केला आहे. मालिकेत झळकलेले अभिनेते विजय पटवर्धन (Vijay Patwardhan) आणि मालिकेसाठी एक वर्ष दिग्दर्शक म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या अमित छिल्लारे (Amit Chhallare) यांनी म्हटलं आहे.
'हे मन बावरे' मालिकेसाठी एक वर्ष दिग्दर्शक म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या अमित छिल्लारे यांनी इन्स्टाग्रामवर सविस्तर पोस्ट करुन आपली बाजू मांडली आहे. अमित यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे की, "पाच वर्षे संयम बाळगला, मंदार सरांचा आदर म्हणून गप्प होतो पण, आता मानसिक त्रास होतोय". तसेच, पुढे बोलताना एकूण सहा लाख सत्तर हजार एकशे एकावन्न रुपयांचं मानधन थकवल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दिग्दर्शकानं इन्स्टाग्राम पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?
माझ्या कामाचे पैसे अजूनही मिळाले नाहीये.
नमस्कार.
मी अमित छल्लारे.
मार्च 2019 ते मार्च 2020 या कालावधीत मी मंदार देवस्थळी सर यांच्या टीम वर्क अल्ट्रा क्रिएशन निर्मित हे मन बावरे या मालिकेसाठी दिग्दर्शक म्हणून काम केले. या एक वर्षात, वेळ काळ न बघता, प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि जीव तोडून काम केले. पेमेंट वेळेत न मिळाल्यामुळे मला सिरिअल सोडावी लागली.
पण अजूनही माझे 6,70,151/- (सहा लाख सत्तर हजार, एकशे एकावन्न) रुपयांचे पेमेंट अडकले आहे.
या पाच वर्षांत मी संयम ठेवला,
अनेकदा संधी दिली,
प्रत्येक वेळी समजून घेतलं,
नेहमीच सपोर्ट केला,
पण मला फक्तं तारखा आणि आश्वासनं मिळत गेली.
मंदार देवस्थळी सर हे खूप सिनिअर आहेत.
त्यांच्याबद्दल नेहमीच आदर आहे आणि राहील. म्हणूनच इतके दिवस गप्पं होतो पण आता त्याच गोष्टींचा विचार करून मला खूप मानसिक त्रास होतोय आणि याआधीही झालाय. आता काय करायचं तुम्हीच सांगा सर.
आज हे सगळं इथे शेअर करतोय, कारण इतके दिवस मी तुमच्या अडचणी समजून घेतल्या पण आता माझ्याही काही अडचणी आहेत, त्या तुम्ही समजून घ्याव्या. एकदा माझ्या बाजूनेही विचार व्हावा. मला कुणालाही दोष द्यायचा नाहीये. पण इतकी वर्ष वाट पाहूनही न्याय न मिळणं माझ्यासाठी खुप त्रासदायक आहे.
आणि ह्या सगळ्यांत माझं काय चुकलं.?
मंदार देवस्थळी सर ज्या अडचणीत आहेत अशी वेळ कुणावरही कधीच येऊ नये.
लवकरच ते ह्यातून बाहेर पडो.
माझ्यासारखे अनेक लोकांचे पैसे अडकले आहेत, ते लवकर मिळो.
सर, तुम्ही लवकर ह्या सगळ्यांतून बाहेर पडावं आणि पुन्हा पहिल्यासारखं जोमाने काम करावं हिच सदिच्छा...
धन्यवाद
(सर तुमच्याबद्दलचा आदर म्हणून इतके दिवस कधी बोललो नाही पण आज मला व्यक्तं व्हावंसं वाटलं . चूकभूल माफ. मला लाईक्स आणि सहानुभूती मिळावी म्हणून मी हे लिहिलं नाहीये. ज्यांना असा अनुभव आला आहे, त्यांना माझं म्हणणं आणि माझी अडचण कळेल)
मालिकेतील अभिनेते विजय पटवर्धन (Vijay Patwardhan) यांनीही आपले पैसे थकल्याचा खुलासा केला आहे. यासंदर्भात त्यांनी सविस्तर पोस्ट लिहित मंदार देवस्थळींवर आरोप केले आहेत.
View this post on Instagram
यापूर्वी मालिकांमध्ये काम केलेल्या कलाकारांनीही देवस्थळींवर केलेले आरोप
'हे मन बावरे' मालिकेत मुख्य भूमिकेत झळकलेला मराठी अभिनेता शशांक केतकरनंही काही वर्षांपूर्वी दिग्दर्शक मंदार देवस्थळीवर (Mandar Devasthali) पैसे थकवल्याप्रकरणी आरोप केले होते. त्यानंतर त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत झळकलेली अभिनेत्री मृणाल दुसानिस आणि शर्मिष्ठा राऊतनंही याविरोधात सोशल मीडियावर भाष्य केलेलं. त्यानंतर या प्रकरणानं संपूर्ण मराठी मालिकाविश्व हादरलं होतं. त्यावेळी दिग्दर्शक-निर्माते मंदार देवस्थळींनी मुदत मागून काही पैसे कलाकारांना देऊ केले, अशी माहिती कलाकारांनीच त्यावेळी दिलेली. पण, आता इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा अभिनेते विजय पटवर्धन आणि दिग्दर्शक अमित छिल्लारे यांनी सोशल मीडियावर व्यक्त होत, मंदार देवस्थळींनी पैसे थकवल्याचे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे मराठी मालिकाविश्वास खळबळ माजली आहे.
दरम्यान, अभिनेते विजय पटवर्धन आणि दिग्दर्शक अमित छिल्लारे यांनी केलेल्या आरोपांवर अद्याप मंदार देवस्थळींनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे या प्रकरणावर त्यांची बाजू अद्याप कळू शकलेली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























