Marathi Ban Film On YouTube: हिंदी असो किंवा भोजपुरी, अनेक चित्रपटांमध्ये हल्ली शिव्या आणि बोल्ड सीन्सचा भडिमार असतोच. डिजिटल प्लॅटफॉर्मवर तर अशा प्रकारचा मजकूर आणखी खुलेपणाने दाखवला जातो. मात्र, सेन्सॉर मंडळाकडून अनेकदा अशा चित्रपटांवर कात्रीही चालवली जाते. तरीही काही चित्रपट असे असतात, जे वादग्रस्त ठरूनही प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चेत राहतात. अशाच एका मराठी चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटावर धाडसी आणि वादग्रस्त दृश्यांमुळे बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता हाच चित्रपट यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे.
कोणता आहे 'हा' चित्रपट?
या चित्रपटाचं नाव आहे नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा. या चित्रपटाचं दिग्दर्शन ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केलं आहे. चित्रपटाची कथा एका 15-16 वर्षांच्या मुलाभोवती फिरते. त्याचा वडील गँगस्टर असतो आणि गँगवॉरमध्ये त्याचा मृत्यू होतो. त्यानंतर हा मुलगा आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतो. वयाने लहान असला तरी त्याचा धारदार आणि धूर्त मेंदू प्रेक्षकांना हादरवून सोडतो.गुन्हेगारी विश्वाचं भीषण वास्तव मांडलं पाहून भल्याभल्यांच्या अंगावर काटा येईल. यातील बोल्ड सीन्स आणि हिंसाचार इतकी उघडपणे मांडली आहेत की, ही फिल्म कुटुंबासोबत पाहणे शक्यच नाही. या चित्रपटात अल्पवयीन मुलांनी काम केल्यामुळे आणि कथानकातील बोल्ड दृश्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे हा चित्रपट सर्व वयोगटासाठी योग्य नसल्याचं म्हटलं गेलं.
युट्यूबवर येताच घालतोय धुमाकूळ
सध्या हा चित्रपट यूट्यूबवर आवृत्तीत उपलब्ध असून प्रेक्षक त्याला मोठा प्रतिसाद देत आहेत. ‘एनएच मराठी’ या यूट्यूब वाहिनीवर या चित्रपटाला 3.6 दशलक्षाहून अधिक प्रेक्षकांनी पाहिलं आहे. वादग्रस्त विषय, धाडसी दृश्यं आणि वेगळं कथानक यामुळे हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यामुळे अनेकजण हा चित्रपट पाहण्याबाबत उत्सुकता दाखवत आहेत.
महेश मांजरेकरांच्या 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' (Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha) या चित्रपटात अल्पवयीन मुलांची लैंगिक मानसिकता बीभत्सपणे दाखवल्याचा आरोप करत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणानंतर पालकांमधून तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून मोठी संतापाची लाट उसळली होती. कथेची पार्श्वभूमी गिरणी संप, गिरणगावातील चाळींशी संबंधित होती. किशोरवयीन मुलाचे नात्यातील प्रौढ महिलेशी संबंध चित्रपटात दाखवण्यात आले होते. यावर गिरणगावातील अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.
