Uma Hrishikesh Diagnosed With Endometriosis Shares Post: मनोरंजन विश्वातील (Entertainment World) अशा अनेक अभिनेत्री (Actress) आहेत, ज्यांनी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली. मात्र, त्यानंतर अचानक त्या पडद्यावरुन गायब झाल्या. प्रसिद्धीझोतात असूनही त्यांनी रुपेरी पडद्यापासून दूर जाणं पत्करलं. अशीच एक अभिनेत्री म्हणजे, 'स्वामिनी' (Swamini), 'अग्गंबाई सूनबाई' (Agabai Sunbai) फेम अभिनेत्री उमा हृषिकेश (Actress Uma Hrishikesh).  

अल्पावधीतच उमा हृषिकेश हिनं आपल्या अभिनय कौशल्यानं प्रेक्षकांच्या मनात अढळ आणि हक्काचं स्थान निर्माण केलं. पण, प्रसिद्धीच्या शिखरावर असूनही अभिनेत्री अचानक इंडस्ट्रीपासून दूर निघून गेली. त्यामुळे तिच्यावर भरभरुन प्रेम करणारे चाहतेही कोड्यात पडलेले. अभिनेत्री उमा हृषिकेश काही वर्षांपूर्वी परदेशात शिफ्ट झाली. तेव्हापासूनच ती सोशल मीडिया, युट्यूबच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात होती. पण, त्यानंतर अचानक ती सोशल मीडियावरुनही गायब झाली. त्यामुळे आणखी संभ्रम वाढला. अशातच तिनं नुकतीच एक लांबलचक पोस्ट लिहून चाहत्याना तिच्या आयुष्यात अचानक आलेल्या एका धक्कादायक वळणाची माहिती दिली. 

उमा हृषिकेशनं तिला झालेल्या गंभीर आजाराची माहिती दिली. तसेच, या आजाराचं निदान झाल्यानंतर तिला तातडीनं शस्त्रक्रियाही करावी लागल्याचंही तिनं सांगितलं. हा संपूर्ण अनुभव उमानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सांगितला आहे.

अभिनेत्री उमा हृषिकेशनं सोशल मीडिया पोस्टमध्ये काय म्हटलंय? (Uma Hrishikesh Social Media Post)

'अगंबाई सुनबाई' फेम अभिनेत्री उमा हृषिकेश हिनं सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिलीय, यासोबत तिनं काही फोटो शेअर केलेत. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिनं लिहिलंय की, "श्री स्वामी समर्थ! सर्वात आधी, तुम्ही सगळ्यांनी मला ज्या शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल तुमचे खूप-खूप आभार. आज तुम्हा सर्वांबरोबर मी काही गोष्टी शेअर करू इच्छिते. सध्या मी न्यूझीलंडमध्ये आहे आणि याठिकाणी मी माझं Masters in Applied Business with a specialisation in Human Resource Management चं शिक्षण घेतलंय. याचबरोबर मी तिथे कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरीही करतेय. नोकरी आणि अभ्यास या दोन्ही गोष्टींचा समतोल साधणं खरंच कठीण होतं, म्हणूनच या धावपळीत, कंटेंट क्रिएशनकडे साहजिकच थोडं दुर्लक्ष झालं. शिक्षण आणि प्रोफेशनल आयुष्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी मी काही काळासाठी सोशल मीडियापासून दूर राहण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतलेला..."

"याचा अर्थ असा अजिबात नाही की कंटेंट तयार करण्याची माझी आवड कमी झाली आहे. उलट, मी लवकरच YouTube आणि Instagram वर पुनरागमन करणार आहे. या काळात आलेले अनुभव, शिकलेल्या गोष्टी आणि माझा प्रवास तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी उत्सुक आहे. मात्र, काही महिन्यांपूर्वी आयुष्यात एक अनपेक्षित वळण आलं. एंडोमेट्रिओसिस (Endometriosis) या आजाराचं निदान झाल्यानंतर माझ्यावर तातडीची शस्त्रक्रिया करावी लागली...", असं उमा हृषिकेश म्हणाली. 

"मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी मी औषधं..."

पुढे बोलताना उमा हृषिकेश म्हणाली की, "मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी मी औषधं घेत असल्यामुळे अनेकदा लोकांनी माझ्यावर टीका केली. "स्त्रियांना हा त्रास सहन करावाच लागतो...", असं मला वारंवार सांगितलं जायचं, जणू वेदनांपासून आराम मिळवण्याची इच्छा व्यक्त करणं म्हणजे कमकुवतपणा... पण नंतर समजलं की, त्या वेदनांमागचं खरं कारण एंडोमेट्रिओसिस होतं. मी सहन करत असलेल्या वेदना सामान्य नव्हत्या. मागे वळून पाहताना आज मला माझ्या शरीराचं आणि त्या काळात मी दाखवलेल्या सहनशक्तीचं अधिक कौतुक वाटतं..."

"या अनुभवानं मला आणखी एक मोठी गोष्ट शिकवली. आपण अनेकदा इतरांच्या आयुष्याबद्दल काहीही न जाणता त्यांच्याबद्दल मत बनवतो किंवा त्यांना दोष देतो. पण प्रत्येक जण आपल्या आयुष्यात काही ना काही संघर्ष शांतपणे झेलत असतो. त्यामुळे दुसऱ्यांबद्दल थोडी सहानुभूती आणि समजूतदारपणा ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. या संपूर्ण अनुभवानं माझा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपलं आरोग्य, याची पुन्हा एकदा जाणीव झाली...", असं उमा हृषिकेश म्हणाली. 

"सध्या माझं संपूर्ण लक्ष माझ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या पुनर्बांधणीवर आहे. आणि माझा अप्रतिम जोडीदार @hrishikeshpendharkar माझ्या पाठीशी असल्यामुळे मी नक्कीच या प्रवासात यशस्वी होईन, याची मला खात्री आहे. आयुष्यानं मला अशा प्रकारे बदललंय, ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. आज मी अधिक शांत, स्थिर आणि प्रगल्भ झालेय. आता माझ्यासाठी प्रगती, कुटुंब आणि उत्तम आरोग्य यांनाच सर्वाधिक महत्त्व आहे. मी आज जिथे आहे त्याबद्दल मनापासून कृतज्ञ आहे आणि पुढचा प्रवास कसा असेल याबद्दल उत्सुकही आहे. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. खूप साऱ्या शुभेच्छा आणि प्रेम...", असं उमा हृषिकेश म्हणाली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bhagyashree Nhalve On Periods And Women Health: 'मी पाळी आल्यावर 3 दिवसांसाठी बाजूला बसते...'; मराठी अभिनेत्रीनं सांगितलं यामागचं मोठं कारण, लग्नानंतर सासरीही तेच फॉलो करते