Sonali Kulkarni On South Actor Nani: साऊथ सुपरस्टार (South Superstar) नानी (Nani) याचा बहुप्रतिक्षित पॅन इंडिया सिनेमा 'द पॅराडाइज'ला (The Paradise) प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमीश्र प्रतिक्रिया मिळालेल्या. पण, तरीही नानीच्या चाहत्यांमध्ये सिनेमाची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळाली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Marathi Actress Sonali Kulkarni) झळकली आहे. सध्या बॉक्स ऑफिस गाजवत असलेल्या या सिनेमात सोनाली कुलकर्णीनं 'सम्माक्का'ची भूमिका साकारली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना सोनाली कुलकर्णीनं (Sonali Kulkarni) तिच्या साऊथ सिनेमात (South Films) काम करण्याचा अनुभव सांगितला. सोनालीनं यावेळी साऊथ सुपरस्टार नानीसोबत काम करण्याचा अनुभवही सांगितला.
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनं नुकतीच 'महाराष्ट्र टाईम्स'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना सोनाली कुलकर्णीनं सुपरस्टार नानीसोबत काम करण्याचा अनुभव आणि एकंदरीत साऊथ सिनेमांबाबत आपलं मत व्यक्त केलंय. लूगू भाषेतील कठीण संवाद मला सहजरीत्या बोलता यावेत, यासाठी नानीनं मला मदत केली, असं सोनाली कुलकर्णीनं सांगितलंय.
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी काय म्हणाली? (Sonali Kulkarni On South Film Industry)
'मुंबई टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत 'द पॅराडाईज' सिनेमातल्या भूमिकेबद्दल बोलताना सोनाली कुलकर्णी म्हणाली की, "सम्माक्का या भूमिकेसाठी कोणाला तरी माझं नाव सुचलं आणि मला तिथून फोन आला की, 'तू ऑडिशनला किंवा मेकर्सना भेटायला येशील का?' माझा ऑडिशन प्रक्रियेवर प्रचंड विश्वास आहे. कारण ऑडिशन म्हणजे, केवळ तुमची अभिनय क्षमता तपासणं नव्हे, तर मेकर्सना तुम्ही त्या पात्राच्या लूकमध्ये किंवा झोनमध्ये बसता का, हेही तपासायचं असतं. त्यासाठी मी हैदराबादला गेले. मला तेलूगू भाषा येत नव्हती. पण तिथल्या ऑडिशन आणि भेटीनंतर मेकर्सनी लगेचच त्या भूमिकेसाठी माझी निवड केली..."
"एका मोठ्या व्यावसायिक सिनेमाच्या चौकटीत त्यांना एका शोषित घटकाच्या अस्तित्वाचा संघर्ष मांडायचा होता. चित्रपटात 'सवारी' नावाच्या जातीला स्वतःची ओळख नाही आणि मी त्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या 'सम्माक्का' या कणखर महिला लीडरची भूमिका साकारत आहे. वैयक्तिक आयुष्यातही मला माझ्या किंवा कोणाच्याही अस्तित्वासाठी आणि समानतेसाठी लढायला नक्कीच आवडेल. माझं खरं आयुष्य आणि विचार ज्या मूल्यांवर आधारित आहेत, तशाच पद्धतीची ही भूमिका असल्यामुळे दिग्दर्शक-निर्मात्यांवर पूर्ण विश्वास ठेवून मी हे काम आनंदानं स्वीकारलं..."
नानी सेटवर स्वतःला मोठा 'स्टार'... : सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni On South Superstar Nani)
साऊथचा सुपरस्टार अभिनेता नानी याच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगताना सोनाली कुलकर्णी म्हणाली की, "तेलूगू भाषेतील कठीण संवाद मला सहजरीत्या बोलता यावेत, यासाठी नानीनं मला मदत केली. काम करताना आमच्या मनात एकमेकांविषयी विश्वास निर्माण झाला. आम्ही केवळ प्रसंगांपुरते मर्यादित राहिलो नाही, तर काम, कुटुंब, विचार, मतं याबद्दलही खूप गप्पा मारल्या..." नानीचं कौतुक करताना सोनाली कुलकर्णी म्हणाली की, "नानी सेटवर स्वतःला मोठा 'स्टार' किंवा 'हीरो' न समजता अगदी एका जवळच्या मित्रासारखा वागायचा. शूटिंग करताना तो मला आणि मी त्याला मोकळेपणानं कोणत्याही गोष्टी सुचवू शकत होतो. अॅक्शन सीन्समध्ये शरीराचा तोल कसा सांभाळायचा किंवा तलवार कशी धरायची, अशा तांत्रिक गोष्टींमध्ये त्यानं मला खूप मदत केली. तो सेटवर प्रत्येकाची आणि सर्व गोष्टींची काळजी घ्यायचा. त्याच्या या वृत्तीमुळे माझ्या मनात त्याच्याबद्दल प्रचंड आदर आणि प्रेम निर्माण झालं आहे..., असं सोनाली शेवटी म्हणाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
