Bhagyashree Nhalave Mother Passes Away: मराठी मनोरंजन विश्वातून (Entertainment Post) एक दुखःद बातमी समोर आली आहे. मराठी मनोरंजनविश्वातली (Marathi Entertainment World) प्रसिद्ध अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्वतः अभिनेत्रीनं याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करुन माहिती दिली आहे. अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवे (Bhagyashree Nhalve) हिनं दोन महिन्यांपूर्वीच आपली लग्नगाठ बांधलेली. पण, आईच्या निधनानंतर मात्र, अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट करुन लग्न केल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. तसेच, लग्न का करायचं नव्हतं, याचं कारणंही दिलं आहे. 

Continues below advertisement

अभिनेत्रीची सोशल मीडिया पोस्ट नेमकी काय? 

अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवे हिनं सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "आई......! आज माझ्या लग्नाला फक्त दोन महिने पूर्ण होत आहेत, पण दोन महिन्यात आई ने मला एकही फोन केला नाही. का तर "सासरी गेलेल्या मुलीला आई ने सारखा फोन करू नये. तिचं संसारात लक्ष लागत नाही." अश्या मताची माझी आई मला एकही फोन न करता देवाघरी गेली. आणि आता माझ्या आई चा कधीच फोन येणार नाही...लग्नाला माझ्या दोन महिने पण झाले नाहीत पण तू मला सोडून गेलीस...हे मला मान्य होत नाहीये.. मला शेवट पर्यंत तुझ्या पाशी रहायचा होत म्हणून मला लग्न न्हवत करायचं...पण तू....! ,"माझी शेवट ची इच्छा आहे राणा तू माझ्या साठी लग्न कर, आणि मागे वळून बघू नकोस, माझं काय पण होईल पण तू मागे वळून यायचं नाहीस. मुलगी म्हणून तू खूप जास्ती केलं आहेस.. तू आता तुझा विचार कर माझ्यासाठी" खूप ठाम तिचा निर्णय." 

"एका भेटीत मला तिने मला लग्नाचा निर्णय द्यायला भाग पाडलं. मी काय करते हे मला तेव्हा लक्षात आलं नाही. फक्त आई सांगतेय आणि आई ची इच्छा म्हणून या लग्नाला उभी राहिले. पण आई आज तू गेल्यावर मला कळलं आहे तू माझ्या साठी निवडलेला मुलगा आणि घर खरंच माझ्या साठी किती बरोबर आहे. तुझ्या साठी मी लग्न केलं पण तू फक्त माझं लग्न पाहिले.... माझा संसार पहायला तू मला आयुष्यभर हवी होतीस. माझ्या नारायणाला आता कोण नमस्कार करेल सांग ? दर पौर्णिमेला मी त्या सत्यनारायणा ला दिवा लावायचे आणि तुझ्या साठी प्रार्थना करायचे...पण कालच्या पौर्णिमेला मी तुझ्या नारायणा सोबत तुझ्या चितेला नमस्कार करत होते. मला तू अशी सोडून जायला नको होतीस.... तुला सगळं उपजत होत आई. म्हणून तू माझी सोय करून गेलीस...आई ला लेकराच चांगलाच कळत हे खरच...पण तरीही आई तू मला हवी होतीस.... आता मला कोण राणा म्हणेल... मला संसारात पाडलंस... आणि तू मात्र निघून गेलीस... तू सांगितल्या प्रमाणे आई मी मागे वळून बघणार नाही हे तुला माझं वचन आहे...", असं भाग्यश्री न्हाळवे हिनं सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

दरम्यान, 'कुंकू, टिकली आणि टॅटू', 'रमा राघव', 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर', 'माटी से बंधी डोर' या मालिकांमधून अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवेनं प्रेक्षकांमध्ये आपली ओळख निर्माण केली. भाग्यश्रीची आई गेल्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. अखेर तिच्या आईनं जगाचा निरोप घेतला. अभिनेत्रीनं आपल्या लग्नातला आईसोबतचा फोटो शेअर करुन एक दुःखद पोस्ट केली आहे.