Sandeep Pathak: महाराष्ट्राला जातीचं राजकारण नवं नाही. आपल्या आजूबाजूला जाती-धर्माची पुटे इतकी चढत गेली आहेत की आपण एकटे पडले आहोत. मुळचा बीडचा असलेला मराठी अभिनेता संदीप पाठक अलीकडेच महाराष्ट्रात होत असलेल्या जातीय आणि धर्मामुळे होत असलेल्या बदलांवर तो बोललाय. 'महाराष्ट्रात जातीय आणि धर्मापोटी डोकेफोड केली जात आहे. यात रक्त सांडलं जातं. माझा धर्म, माझी जात, माझं कुटुंब, मी -माझं - मला... यापलीकडे आपण बघायलाच तयार नाही आहोत. या जाती धर्माच्या भिंती खुजा करा' असं आवाहन मराठी अभिनेता संदीप पाठकने बीडकरांना केलंय. बीडच्या माजलगाव शहरातील एका महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलन प्रसंगी तो बोलत होता. यावेळी बीडच्या सामाजिक स्थितीवर त्याने परखड भाष्य केलं. (Sandeep Pathak On Beed Social Situation)
काय म्हणाला संदीप पाठक? (Sandeep Pathak)
संदीप पाठक म्हणाला,"कदाचित आजूबाजूची परिस्थिती अशी आहे. जाती आणि धर्माच्या भिंतींमध्ये आपण अडकलो आहोत. आम्ही शिकत असताना या जाती आणि धर्मांच्या भिंती खूप खुजा होत्या. छोट्या होत्या. पण त्याच्यावर हळूहळू राजकीय पक्ष, राजकीय नेते, जे कोणी असतील त्यांनी हळूहळू विटांचे बांधकाम करायला सुरुवात केली आणि हळूहळू त्या बांधकामाची उंची इतकी वाढली की आपण एकटे पडत गेलो. माझा धर्म, माझी जात, माझं कुटुंब, मी -माझं - मला... यापलीकडे आपण बघायलाच तयार नाही आहोत. त्यामुळे मला असं वाटतं, उद्याचा भारत माझ्यासमोर बसलेला आहे. तुम्ही या जाती धर्माच्या भिंती खुजा केल्या पाहिजेत. करण ज्ञानेश्वर माऊली असतील, जगद्गुरु संत तुकाराम असतील, संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज असतील , आपल्या संतांची परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रात जातीय आणि धर्मापोटी डोकेफोड केली जात आहे. यात रक्त सांडलं जातं. म्हणून मी रक्तदान शिबिराचा आयोजन केलं. दगड हातात घेऊन एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा एकमेकांचा हात हातात घ्या. मानवतेचा, सोबतीचा एकतेचा संदेश डोक्यामध्ये घ्या. सांडणारा रक्त एखाद्या बाटलीत एकत्र केलं तर उद्या एखाद्याला रक्ताची नितांत गरज असेल तर ते रक्त त्या माणसाला कामी येईल." असं अभिनेता संदीप पाठक म्हणालाय.
संदीप पाठक हा मूळचा बीड जिल्ह्यातल्या माजलगावचा आहे. त्याने अनेक मराठी चित्रपट, मालिका, नाटकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. पोस्टर गर्ल,हरिश्चंद्राची फॅक्टरी,रंगा पतंगा तसेच वऱ्हाड निघालं लंडनला या नाटकामधून त्यानं प्रेक्षकांचे मनोरंजन केलंय.
