Marathi Actor Death: मराठी मनोरंजनसृष्टीतून पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अवघ्या 25 व्या वर्षी मराठी अभेनेत्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय. अभिनेता सचिन चांदवडे (Sachin Chandavade) याने 23 ऑक्टोबर रोजी आत्महत्या केल्याचं उघडकीस आल्यानंतर मराठी कलाविश्वात खळबळ उडालीय. महत्वाची भूमिका असणारा त्याचा चित्रपट 'असुरवन' नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. त्याआधीच त्याने असे टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त होतेय.
अभिनेता सचिन चांदवडे याने जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातल्या उंदिरखेडे गावात त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. त्याच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
नेमके घडले काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सचिनने घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत पंख्याला गळफास घेतल्याचे समजते. त्यानंतर तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रकृती गंभीर झाल्याने त्याला पुढे धुळे येथील रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र २४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
सचिन चांदवडे हा मूळचा इंजिनिअर असून पुण्यातील आयटी पार्कमध्ये नोकरी करत होता. मात्र, अभिनयाची आवड असल्यामुळे त्याने नोकरीसोबतच अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलं होतं. महत्वाची भूमिका असणारा सचिनचा सिनेमा ‘असुरवन’ लवकरच प्रदर्शित होणार होता. काही दिवसांपूर्वीच त्याने या चित्रपटाचं पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केलं होतं, यात तो अतिशय उत्साहित असल्याचं दिसत होतं.
सहकलाकारांनी व्यक्त केल्या भावना
फक्त एवढंच नाही, तर सचिनने नेटफ्लिक्सवरील ‘जमतारा 2 ’ या लोकप्रिय सीरिजमध्येही झळकून आपली वेगळी छाप सोडली होती. तसेच गणेशोत्सव, गुढीपाडवा अशा सणांच्या वेळी अनेक प्रसिद्ध मराठी कलाकारांसोबत ढोलवादनाचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते.अवघ्या 25व्या वर्षी सचिनसारख्या तरुण आणि प्रतिभावान कलाकाराने आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार, त्याचे मित्र आणि चाहत्यांनी सोशल मीडियावरून भावनिक श्रद्धांजली वाहत त्याला आठवलं आहे. कलाकंद प्रोडक्शन हाऊसनेही त्यांच्या अधिकृत पेजवर पोस्ट शेअर करत लिहिलं, “आमचा असुरवनचा नायक आता आमच्यात नाही, पण त्याचा अभिनय कायम स्मरणात राहील.”