Marathi Actor Pavan Choure On Gautami Patil: आपल्या अदांनी अनेकांचं लक्ष वेधून घेणारी नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. त्यासाठी कारण ठरतंय, तिच्या कारमुळे झालेला अपघात. गौतमी पाटील (Gautami Patil Car Accident) हिच्या गाडीचा पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ भीषण अपघात झाला. गौतमीच्या ड्रायव्हरनं भल्या पहाटे एका रिक्षाला जोराची धडक दिली. या अपघातात रिक्षाचालकासह 3 जण जखमी झालेत. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी असून सामाजी विठ्ठल मरगळे असं त्याचं नाव आहे. या प्रकरणी ज्या कारमुळे अपघात झाला, ती कार गौतमी पाटीलच्या नावावर असल्यामुळे पोलिसांनी तिला नोटीस धाडली आहे. अशातच आता या प्रकरणी मराठी अभिनेत्यानं गौतमी पाटीलवर निशाणा साधला आहे.
मराठी अभिनेता पवन चौरे नेमकं काय म्हणाला?
मराठी अभिनेता पवन चौरे यानं सोशल मिडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्यानं गौतमी पाटीलवर पु्ण्यातील अपघात प्रकरणावरुन टीकास्त्र डागलं आहे. "गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलाच आहे. मग तू काय गोरगरीब जनतेला ही त्रास द्यायचा ठेका घेतलाय का?… तुझी कार एका रिक्षाला उडवते आणि तिथून तू पळून जातेस. परत तुझ्या गाडीत कोण कोण होतं, हे ही तुलाच माहीत. पोलीस यायच्या आधी तुझी गाडी उचली जाते, प्रकरण दाबण्यासाठी.", असं अभिनेता म्हणालाय.
पुढे बोलताना पवन चौरेनं म्हटलंय की, "बिचाऱ्या रिक्षा चालकाला किती लागलंय, त्याच काय झालंय? चौकशी न करता पळ काढता कारण तुझे काळे धंदे बाहेर येतील म्हणून. आज रिक्षा चालक दीनानाथ रुग्णालयात व्हेंटीलेटरवर आहे. या घटनेला चार दिवस झाले तरी तू साधं एक माणुसकीच्या नात्याने विचारपूस पण केली नाहीस. हेच तुझे संस्कार का? एक गोष्ट लक्ष्यात ठेव, एक सामान्य माणूस जेवढा वरती घेऊन जातो तेवढाच खाली आपटू पण शकतो... तुझ्या या कृत्याचा जाहीर निषेध…"
दरम्यान, पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ 30 सप्टेंबर रोजी एका हॉटेलसमोर एक रिक्षा उभी होती. त्यात रिक्षाचालकासह दोन प्रवासी होते. मागून आलेल्या गौतमी पाटीलच्या भरधाव कारनं उभ्या असलेल्या रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की, यामध्ये रिक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या अपघातात रिक्षाचालकासोबतच रिक्षातील दोन प्रवासीही गंभीर जखमी झाले. पोलिसांना अपघाताबाबत माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, अपघातानंतर कारचालक फरार झाला होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी 30 वर्षीय वाहन चालकाला अटक केली आहे.