Mahesh Kokate negative role interview Marathi: छोट्या पडद्यावरील अनेक मालिका त्यातील पात्रांसाठी ओळखली जातात. काही भूमिका प्रेक्षकांमध्ये अजरामर होतात. काही पात्रांचं कौतुक होतं. तर काही पात्र आपल्या नेगिटिव्ह भूमिकांमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेत असतात. सुप्रसिद्ध अभिनेते महेश कोकाटे यांनाही त्यांच्या भूमिकांमुळे ओळख मिळाली. त्यांनी अनेक मालिकांमध्ये नेगेटिव्ह भूमिका साकारली आहे. अलिकडेच त्यांनी मुलाखतीत चाहत्यांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियांबद्दल माहिती दिली. त्यांनी काही मराठी मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका साकारली होती. त्यामुळे प्रेक्षकांकडून त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. सध्या त्यांची मुलाखत सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
मराठी कलाकार महेश कोकाटे यांनी आपल्या कारकिर्दीत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका साकारली आहे. महेश कोकाटे हे सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मुळे चर्चेत आहेत. या मालिकेत ते गंगाधर शास्त्री ही व्यक्तीरेखा साकारत आहे. ही व्यक्तीरेखा नकारात्मक असून, प्रेक्षकांकडून ट्रोल केलं जात असल्याची माहिती समोर आली आहे. नकारात्मक भूमिकांमुळे आपल्याला खूप वाईट अपशब्द ऐकावं लागतं, अशी खंत त्यांनी मुलाखतीतून व्यक्त केली. परंतु, हीच प्रेक्षकांकडून मिळणारी पोचपावती आहे, असंही महेश कोकाटे म्हणाले.
महेश कोकाटे यांनी आपल्या कारकिर्दीत गंगाधर शास्त्री ऐवजी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतही नकारात्मक भूमिका साकारली होती. अनाजी पंत हे पात्र त्यांनी साकारले असून, ही भूमिका नेगेटिव्ह होती. नकारात्मक भूमिकांबद्दल राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत महेश कोकाटे म्हणाले, 'लोक मला मी साकारलेल्या भूमिकांसाठी शिव्या देतात. हीच माझ्या कामाची पोचपावती. मला पाहिल्यानंतर लोक मला कुचका, मेल्या असं म्हणतात. हाच माझा पुरस्कार आहे', असं महेश कोकाटे म्हणाले.
'माझ्या आयुष्यातील मी साकारलेली पहिली नकारात्मक व्यक्तीरेखा म्हणजे अनाजी पंत. त्यानंतर अगं बाई सासूबाईमध्येही नेगेटिव्ह भूमिका साकारली होती. त्यानंतर ऐतिहासिक मालिकांमध्येही नकारात्मक भूमिका साकारली आहे. स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत खंडोजी खोपडे, स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेत नागोजी माने या नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. नकारात्मक भूमिका साकारत असताना मला जाणवलं की, मी खूप नेगेटिव्ह भूमिका साकारल्या आहेत. पण नंतर मला अबोली मालिकेत सकारात्मक भूमिका साकारायला मिळाली. मला खूप मजा आली', असं महेश कोकाटे म्हणाले.
