Bhushan Kadu: मराठी मनोरंजनविश्वातील सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता भूषण कडूने आतापर्यंत अनेक नाटक, सिनेमातून प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. पत्नीच्या निधनानंतर अभिनेता भूषण कडू मोठ्या कठीण प्रसंगातून जात होता. करोनामध्ये त्याच्या पत्नीचं निधन झालं . त्यानंतर त्याच्या आर्थिक अडचणीही वाढल्याचं  त्याने एका मुलाखतीत सांगितलेलं. स्वतःला संपवण्याचे विचारही मनात आल्याचं त्यानं सांगितलेलं. आता सगळ्या दुःखातून तो बाहेर पडतोय. या निराशेवर मात करत भूषण आता पुन्हा एकदा रंगभूमीवर परततोय. (Bhushan Kadu)

Continues below advertisement

नवीन नाटकातून परतणार भूषण कडू 

अलीकडेच राजश्री मराठीला त्याने मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याच्या आगामी प्रोजेक्टविषयी त्याला विचारण्यात आलं. त्यावेळी एक नवीन नाटक करणार असल्याचं म्हणाला. 'एक नवीन नाटक लिहिलं असून ते नाटक विनोदी आहे,सस्पेन्स पण आहे, थोडं हॉरर आहे. आपल्या समाजातील गोष्टींवर, कसं असावं आणि कसं नसावं, यावर भाष्य करणारं नाटक आहे. 

तो पुढे म्हणाला," माझ्या नाटकाच्या सेटची गंमत आहे. तो एक बंगला आहे. त्याच्यामध्ये बस तुटून आतमध्ये येते आणि काही प्रवासी त्या बंगल्यात उतरतात आणि तिथे अडकतात. ते नऊ प्रवासी नऊ दिवस त्या हवेलीमध्ये अडकून असतात.' खरंतर ही संकल्पना मला बिग बॉसमुळे सुचल्याचं तो म्हणाला. तो पुढे म्हणाला," त्यांना आतमध्ये ठेवायचं अडकवून, मग त्यावर घडत जाणारे विनोद, सस्पेन्स किंवा ते एकमेकांचा खून करतील का? अशी संकल्पना. पण, आनंदी शेवट होतो. असं सुटसुटीत व्यावसायिक नाटक आहे.'

Continues below advertisement

बायकोच्या निधनानंतर भूषणवर दुःखाचा डोंगर 

कोरोनाच्या काळात पत्नीचं निधन झाल्यानंतर 11  वर्षांच्या मुलाची जबाबदारी एकट्याने सांभाळताना तो पूर्णपणे खचला होता. हातात काम नव्हतं, आर्थिक अडचणी होत्या आणि मुलाच्या छोट्या इच्छा पूर्ण करता येत नसल्याची खंत त्याला सतावत होती. नैराश्य इतकं वाढलं की त्याने आत्महत्येचाही विचार केला होता. मात्र योगायोगाने काही चाहत्यांनी आणि स्वामी समर्थांच्या मठातील मठाधिपतींनी दिलेला आधार, समुपदेशन आणि आर्थिक मदतीमुळे त्याचा दृष्टिकोन बदलला. हळूहळू त्याने नव्याने जगण्याचा निर्णय घेत पुन्हा कामाला सुरुवात केली.