The Family Man Web Series :  'द फॅमिली मॅन' (The Family Man) या वेब सीरिजमधील मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) साकारत असलेल्या श्रीकांत तिवारीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या आधी रिलीज झालेल्या 'द फॅमिली मॅन'च्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. आता, चाहत्यांना तिसऱ्या सीझनची उत्सुकता लागली आहे. या वर्षाच्या अखेरीसपर्यंत द फॅमिली मॅनचा तिसरा सीझन रिलीज होण्याची शक्यता आहे. मात्र, मनोज वाजपेयी साकारत असलेला श्रीकांत तिवारी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. एका वृत्तानुसार, सीरिजचा चौथा सीझन हा अखेरचा सीझन असण्याची शक्यता आहे. 


दिग्दर्शक  राज निदिमोरू आणि कृष्णा डीके आधीच या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनवर काम करत आहेत आणि चौथ्या सीझनसह या वेब सीरिजला पूर्णविराम लावण्याची शक्यता आहे. 'मिड-डे'च्या वृत्तानुसार, 'द फॅमिली मॅन 3'चे चित्रीकरण सुरू असताना दुसरीकडे आता चौथ्या सीझनची तयारी सुरू झाली आहे. मात्र, 'द फॅमिली मॅन' ही सीरिज पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय निर्मात्यांनी अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. तिसऱ्या सीझनची लोकप्रियता आणि निर्मात्यांची मते 'द फॅमिली मॅन'चे भवितव्य ठरवणार असल्याचे वृत्तात म्हटले आहे. 


श्रीकांत तिवारीची व्यक्तीरेखा संपणार...


2019 मध्ये लॉन्च 'द फॅमिली मॅन' वेब सीरिज लाँच झाली होती. या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री प्रियामणी ही मनोज वाजपेयीच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. तर शारीब हाश्मी हा त्याचा सहकारी दाखवण्यात आला  आहे. दुसऱ्या सीझनमध्ये समंथा रुथ प्रभूने आपल्या निगेटिव्ह भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. आता, तिसऱ्या सीझनमध्ये  सुचित्रा तिवारीच्या भूमिकेत प्रियमणी, जेके तळपदेच्या भूमिकेत शरीब हाश्मी, धृती तिवारीच्या भूमिकेत अश्लेषा ठाकूर आणि अथर्व तिवारीच्या भूमिकेत वेदांत सिन्हा यांच्यासह अनेक कलाकार पुन्हा एकदा झळकणार आहेत. राज-डीके यांची ही वेब सीरिज कॉमेडी आणि स्पाय थ्रिलरचा यांचा मेळ आहे. 


चौथ्या सीझनची तयारी सुरू...


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'द फॅमिली मॅन' ही वेब सीरिज  संपवण्याचा विचार अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे. तिसरा सीझन संपल्यानंतरच सर्वांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे. चौथ्या सीझनची स्क्रिप्टिंग आधीच सुरू झाले आहे. टीम तिसऱ्या सीझनच्या शूटिंग शेड्यूलमधील ब्रेकचा वापर करून नवीन स्क्रिप्टवर काम करत आहे. तथापि, निर्मात्यांनी अद्याप याची पुष्टी केलेली नाही.