Marathi Actor Manmohan Mahimkar: आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर (Manmohan Mahimkar) यांना 'जत्रा', 'ही पोरगी कोणाची' यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलंय. आयुष्यभर प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, पण आता उतारवयात मात्र मनमोहन माहिमकरांचं दैनंदिन आयुष्य जगणंही कठीण झालं आहे. त्यांना इच्छा मरण हवंय, असंही ते सांगतात. दररोजचंजेवण जेवायलाही त्यांच्याकडे पैसे नाही, कसंबसं डाळ-भात, दही-भात खाऊन ते आपलं आयुष्य ढकलतायत, एवढे भोग कमी की काय? तर कित्येक वर्षांपूर्वी सोडून गेलेला भाऊ आता पुन्हा आला असून त्यांना प्रॉपर्टीसाठी त्रास देत असल्याचंही त्यांनी सांगितलं. तर, भावाची बायको त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याचंही ते म्हणाले.
'लोकमत फिल्मी'च्या 'द अनटोल्ड स्टोरी' कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी आपली व्यथा मांडत मनातील दु:ख व्यक्त केलं आहे. आता मात्र मनमोहन माहिमकर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून काम मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत, असंही ते म्हणाले. वय झाल्यामुळे माझी काळजी घेण्यासाठी कोणी तयार नाही. एकट्याला घर खायला उठतं, असंही त्यांनी मुलाखतीत बोलताना सांगितलं.
ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर नेमकं काय म्हणाले?
अभिनेते मनमोहन माहिमकर म्हणाले की, "आता काम नसल्यामुळे मी पोरका आहे. मला कोणीच नाहीय, आणि आमची जुनी बिल्डिंग होती, ती आता डेव्हलपमेंटला गेलेली आहे. पहिलं दोन-तीन वर्ष बिल्डर्सनी भाडं दिलं, आता देत नाहीत. मी एकटा राहतो, भात चढवतो, डाळ भात करतो फक्त... कधीतरी बाहेरुन चपात्या आणतो, कधीतरी भाजी आणतो. मटण खाण्यासाठी माझ्याकडे पैसे उरलेलेच नाहीत. त्यामुळे ती इच्छा मी मारून टाकतो... पैसे नसल्यामुळे साधंच काहीतरी जेवतो... कधी दही-भात खातो, कधी लोणचं भात खातो... आणि कसेतरी दिवस काढतो... कोणी आता राहिलेलं नाही या वयात माझ्याबरोबर... वय झालंय माझं, कोण माझ्याकडे आता बघायला तयार नाही..."
भाऊ आणि वहिनी प्रॉपर्टीसाठी त्रास देतायत : मनमोहन माहिमकर
"मला मोठा भाऊ आहे... 69 सालापासून लग्न करुन निघून गेला होता, त्यानंतर 50-55 वर्षांत कधी आलेलाच नाही... रेशन कार्ड वैगरे सगळं घेऊन गेलाय... आणि आता त्याला माहीत पडलं आमच्याकडे डेव्हलपमेंट होतंय माझ्याकडे आला, आता मला जागा विकायला लावतोय, मला बोलतो एकतर तू आश्रमात जा आणि तिकडे राहा आणि जागेची वाटणी कर... एवढं असताना मी त्याला सांगितलंय मी मेल्यावर तुला जागा मिळणारच आहे, तो काय म्हणतो, मी काय तुझ्या मरणाची वाट पाहू का? त्यानं आणि त्याच्या बायकोनं मला कोर्टात खेचलं पुरावे नसताना आता माझं जीवन जगणं खूप कठीण होतं चाललं आहे, मला वहिनीनं सांगितलंय की, तू जर ही जागा विकून आम्हाला पैसे नाही दिले, तर मी बाईमाणूस आहे मी तुझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करेन आणि ही जागा मिळवून दाखवेन...", असं मनमोहन माहिमकर म्हणाले आहेत.
मनमोहन माहिमकरांना हवंय इच्छा मरण
मनमोहन माहिमकरांना इच्छामरण हवं असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच, त्यासाठी त्यांनी राज्यपालांकडे अर्ज दाखल केल्याचंही ते म्हणाले. पण इच्छा मरण मला मिळू शकत नाही आणि आता कामंही मिळू शकत नाही, असंही त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :