Manisha Koirala : चित्रपटांमध्ये आपल्याला असे अनेक सीन पाहायला मिळतात जे रोमांचक असतात. पण हे पाहताना आपण अनेकदा याची कल्पनाही करू शकत नाही की हे शूट करताना कलाकारांना किती कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले असेल. बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोयराला (Manisha Koirala) यांनी अशाच एका कठीण अनुभवाबद्दल त्यांच्या मुलाखतीत सांगितले. त्यांनी सांगितले की, ‘बॉम्बे’ (Bombay) या चित्रपटाच्या वेळी त्यांना एका जंगलात शूट करावे लागले होते, जे अत्यंत कठीण होते.
मनीषा कोयराला यांनी 'तू ही रे' या गाण्याच्या शूटिंग दरम्यान जळूंनी भरलेल्या जंगलातील अनुभव सांगितला. एका मुलाखतीत मनीषा कोयरालाने सांगितले, "‘तू ही रे’ हे गाणं खूपच अवघड होतं. यामध्ये दोन ठिकाणी शूटिंग करावं लागलं आणि दोन्हीही ठिकाणं अत्यंत कठीण होती. एक ठिकाण डोंगरकड्यावर होतं आणि त्या डोंगरावर समुद्राच्या लाटा आदळत होत्या, त्यामुळे मोठमोठे पाण्याचे तवंग उडत होते. हे खूपच धोकादायक होतं. पण तरीही आम्ही त्या ठिकाणी शूटिंग केलं आणि ते योग्य प्रकारे पार पडलं."
जंगलात घेतलं शूटिंग
त्या पुढे म्हणाल्या, "दुसरं ठिकाण... मला माहिती नाही तो नक्की कोणता भाग होता, पण आम्ही घनदाट जंगलात होतो आणि ते जंगल पूर्णपणे जळूंनी भरलेलं होतं. तुम्ही जर थोडंसंही पुढे चाललात, तरी तुमच्या पायाला लगेच जळू लागायच्या. त्या गाण्यासाठी मला निळ्या रंगाची स्कर्ट घालावी लागली होती आणि जंगलात धावावं लागलं होतं. ते जंगल जळूंनी भरलेलं होतं, त्यामुळे खूप त्रास झाला. पण आम्ही अशा कठीण परिस्थितीतही कसं पुढे जायचं, हे शिकून घेतलं."
28 वर्षांनी मिळाला खास प्रोजेक्ट
त्याआधी 'हीरामंडी'च्या प्रमोशनदरम्यान मनीषा यांनी त्यांच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाबाबत NDTV शी बोलताना सांगितले की, "जेव्हा मला हा प्रोजेक्ट मिळाला, तेव्हा मी नेपाळमध्ये होते, बागायती करत होते आणि मला खूप आनंद झाला होता. मी खूप दिवसांपासून याची वाट पाहत होते. तब्बल 28 वर्षं वाट पाहिल्यानंतर अखेर संजयने (लीला भन्साळी) एक चांगला प्रोजेक्ट दिला आणि मी त्यांना सांगितलं, ‘संजय, मला पुन्हा असा चांगला प्रोजेक्ट देण्यासाठी आणखी 28 वर्षं लागू देऊ नकोस.’"
इतर महत्त्वाच्या बातम्या