Pune Balgandharva: पुण्याचं (Pune) वैभव अशी ओळख असलेलं आणि अनेक कालाकाराचं हक्काचं दुसरं घर असलेलं बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला. त्यानंतर अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त केली. गायक मंगेश बोरगावरनेसुद्धा यासंदर्भात फेसबुक पोस्ट करत नाराजी दर्शवली. बालगंधर्व पाडण्याची खरंच गरज आहे का? त्यापेक्षा कलाकारांना नाट्यगृहात वेगगेगळ्या सुविधा कशा पुरवता येईल?, याकडे लक्ष द्या, असा प्रश्नही त्याने उपस्थित केला आहे.
या पोस्टमध्ये नागरिकांना किंवा त्याच्या चाहत्यांच्या काय वाटतं?, हे जाणून घेण्याचा त्याने प्रयत्न केला. त्यावर सामान्य नागरिकांनी देखील यावर नाराजी व्यक्त केली आहे. "रंगमंदिर स्मार्ट करण्यासाठी झाडं तोडणं मला पटत नाही आणि रंगमंदिर तिथला परिसर आहे तसा ठेवून, रंगमंदिर स्मार्ट बनवता येईल पण हे समजल तर घडू शकेल, असो महानगरपालिका ठरवेल तसं..." अशा अनेक नाराजीचे सूर असलेल्या प्रतिक्रिया आल्या आहेत.
बालगंधर्व रंगमंदिरात कला सादर करण्याचं प्रत्येकच कलाकाराचं स्वप्न असतं. अनेक कलाकारांना या रंगमंदिराने मोठं केलं तर अनेकांना स्वतंत्र ओळख दिली. कोरोना काळात अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली होती. आता सगळं सुरळीत होत असताना रंगमंदिराचा पुनर्विकास करण्यात येत असल्याने काही दिवस कलाकारांवर पुन्हा एकदा तीच वेळ येण्याची शक्यता दिसते आहे.
पोस्टमध्ये मंगेशने काय लिहिलंय?
परवा पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे कार्यक्रम झाला तेव्हा "तुमचा हा इथला शेवटचा कार्यक्रम" असं सांगण्यात आलं..सुरुवातीला कोणीतरी मज़ा करतंय अस वाटलं..पण दुर्दैवाने हे खरयं कळल्यापासून मात्र त्रास होतोय.. पार्किंग मधील झाडे ही तोडलेली दिसली..खरचं याची गरज आहे का!?? कोविड नंतर आता कुठे आपण सावरतोय..याऊलट सर्व नाट्यगृहांमधील सुविधा कशा उत्तम करता येतील याकडे ज़र लक्ष दिलं गेलं तर उत्तम होईल अस एक कलाकार व रसिक म्हणून मनापासून वाटतं…आपल्याला काय वाटतं हे जाणून घ्यायला आवडेल….
पुण्यातील बाकी नाट्यगृहाकडे दुर्लक्ष-
पुण्यात एकून १४ नाट्यगृह आहेत. त्यातील तीन नाट्यगृह सुरू आहेत. बाकी नाट्यगृहात योग्य सुधारणा करुन ती नाट्यगृहे कलाकारासाठी सुरु करुन देणं गरजेचं असताना बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करणं गरजेचं नाही. बालगंधर्व सारखी वास्तू कुठेही नाही, असं मत सामान्य नागरिकांनी व्यक्त केलं आहे.