Mangala Bansode On Gautami Patil : प्रसिद्धीच्या झोतात आलेली नृत्यांगणा गौतमी पाटीलचा (Gautami Patil) एका कार्यक्रमात चेंजिंग रुममध्ये कपडे बदलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. ही अत्यंत लाजिरवाणी घटना असून यावरुन सर्वच क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महिला कलावंताचा असा व्हिडीओ काढून तो व्हायरल करणं निंदनीय आहे. महाराष्ट्रात महिला कलावंतांची हेटाळणी का केली जाते?, असा सवाल लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे-करवडीकर (Mangala Bansode) यांनी उपस्थित केला आहे.


मंगला बनसोडे काय म्हणाल्या?


मंगला बनसोडे म्हणाल्या की, "गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्याबद्दल खूप वाईट वाटत आहे. हा महाराष्ट्र जिजाऊंचा आहे, रमाबाईंचा आहे, सावित्रीबाई फुलेंचा आहे." अशा महाराष्ट्रात एका स्त्रीची, महिला कलावंतांची हेटाळणी का केली जाते? असा सवाल मंगला बनसोडे यांनी उपस्थित केला आहे. 


मंगला बनसोडे पुढे म्हणाल्या की, "गौतमी पाटील एक स्त्री आहे आणि नंतर कलावंत आहे. त्यामुळे तिचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल करणं चुकीचं आहे. गौतमी कलावंत असली आणि तिच्या हातून चुका झाल्या असल्या तरी तिने याबद्दल माफी मागितली आहे. परंतु आता स्त्रीजातीची विटंबना होत असल्यामुळे खूप वाईट वाटत आहे. अशापद्धतीची विटंबना पुन्हा करु नये अशी माझी विनंती आहे. मीदेखील एक कलावंत आहे, स्त्री आहे. त्यामुळे माझ्या विनंतीला मान द्या आणि तो व्हिडीओ व्हायरल करणं बंद करा". 


रुपाली चाकणकरांनी घेतली दखल 


मंगला बनसोडे यांच्याआधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनीदेखील गौतमी पाटीलच्या व्हायरल व्हिडीओची दखल घेतली होती. रुपाली चाकणकर यांनी ट्वीट केलं होतं की, "लावणी कलाकार गौतमी पाटील यांचे चोरुन चित्रीकरण करत चेंजिंग रुममधील खासगी व्हिडीओ समाज माध्यमांवरुन प्रसारित केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे येथे तक्रार नोंदवण्यात आली आहे". 






संबंधित बातम्या


Gautami Patil : गौतमी पाटीलच्या 'त्या' व्हायरल व्हिडीओची महिला आयोगाकडून दखल; रुपाली चाकणकर यांची ट्वीटद्वारे माहिती