Iranian Actress Mandana Karimi Leaving India: सध्या इराण-इस्त्रायल (Iran Israel War) यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे तणाव वाढला आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेल्या आखाती देशांमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच, आखाती देशांमध्ये अडकलेले अनेक भारतीय केंद्र सरकारकडे मदतीसाठी याचना करत आहेत. अशातच आता एका बॉलिवूड अभिनेत्रीनं (Bollywood Actress) केलेल्या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अभिनेत्रीचं म्हणणं आहे की, तिला भारत सोडायचाय, इथे तिला सुरक्षित वाटत नाही, त्यामुळे तिला इराणला जायचं आहे, असं अभिनेत्रीचं म्हणणं आहे. 

नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना मूळची इराणची (Iran) असलेली अभिनेत्री मंदाना करिमी (Actress Mandana Karimi) हिनं भारत सोडण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं. एका मुलाखतीत बोलताना तिनं सांगितलं की, सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, तिनं स्पष्ट केलं की, ती देशाबाहेर गेल्याशिवाय अधिक माहिती देऊ शकत नाही. मंदाना बऱ्याच काळापासून इराणमधली परिस्थिती आणि तिथल्या मुद्द्यांवर बोलतेय. ती म्हणते की, तिच्या सततच्या सक्रियतेमुळे आणि राजकीय वक्तृत्वामुळे तिला एकटं आणि असुरक्षित वाटू लागलं आहे. परिणामी, तिला आता भारतात राहणं तिच्यासाठी असुरक्षित वाटतंय, त्यामुळेच तिनं इराणला परतण्याचा निर्णय घेतलाय.  

इराणी अभिनेत्री मंदाना करिमी गेल्या अनेक वर्षांपासून भारतात राहतेय. तिनं भारतातच तिचं करिअर घडवलं, सर्वात आधी मंदानानं मॉडलिंग केलं आणि नंतर सिनेमांमध्ये काम केलं. पण आता मंदाना तिच्या मायदेशी, इराणला परतू शकते. नवं सरकार स्थापन होताच, ती इराणला परत जाणार असल्याचंही तिनं सांगितलं. 

इराणबद्दल उघडपणे मांडलं मत 

मंदाना करिमी गेल्या अनेक वर्षांपासून इराणमधील राजकीय परिस्थितीबद्दल उघडपणे बोलतेय. तिनं इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या धोरणांवर टीका केली आहे आणि तेथील लोकांच्या समर्थनार्थ आवाज उठवला आहे. ती म्हणते की, भारतात राहूनही ती इराणमधील परिस्थितीबद्दल सातत्यानं बोलते, अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले आणि कधीही गप्प राहिले नाही. पण आता तिला वाटतंय की, या संघर्षाचा तिच्या वैयक्तिक जीवनावर आणि सुरक्षिततेवर परिणाम झालाय.

"मृत्यूच्या धमक्या येत राहिल्या... : मंदाना करिमी

इराणमधील राजकीय परिस्थितीबद्दल उघडपणे बोलल्यामुळे अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत का? असं मंदाना करिमीला उघडपणे विचारलं. त्यावर तिनं अत्यंत धक्कादायक खुलासा केला. मंदाना करिमी म्हणाली की, "नेहमीच..." पुढे बोलताना तिनं सांगितलं की, "या कठीण काळात तिला मित्रांकडून, सरकारकडून किंवा माध्यमांकडून पाठिंबा मिळाला नाही... यामुळे, भारत आता तिला आपलं घर वाटत नाही. तिनं असंही म्हटलंय की, परिस्थिती कठीण आहे, पण ती इराण आणि तेथील लोकांसाठी पुन्हा ते सर्व सहन करण्यास तयार आहे..."

इराणसाठी लढाई सुरूच राहील... : मंदाना करिमी

मंदाना भारत सोडत असली तरी, तिनं स्पष्ट केलंय की, इराणच्या भल्यासाठी ती नेहमीच आवाज उठवणार, कधीच थांबणार नाही. तिनं सांगितलं की, यावेळी इराणच्या लोकांकडे नेतृत्व आहे आणि ते बदलासाठी तयार आहेत. 'जाविद शाह' आणि 'रझा पहलवी' यांचा उल्लेख करताना सांगितलं की, चळवळ आता संघटित आणि पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहे. मंदाना यांच्या मते, हा केवळ दबावाचा काळ नाही तर तयारीचा काळ आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

इराणच्या एअरस्ट्राइकमध्ये दिग्गज दिग्दर्शकासह संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू? सोशल मीडियावर खळबळ, चाहत्यांच्या अश्रुंचा बांध फुटला