Iran Isreal War: इजरायल-इराण युद्धामुळे मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाचा परिणाम विमानसेवेवरही स्पष्टपणे दिसून येत आहे. अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली असून काहींचे मार्ग बदलण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक प्रवासी विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराची (Malaika Arora) आई जॉइस अरोरा या देखील सध्या दुबईत अडकल्या आहेत. मात्र त्यांनी आपण सुरक्षित असल्याचं सांगत कुटुंबीयांना आणि चाहत्यांना दिलासा दिला आहे.

दुबईत अडकल्या, पण सुरक्षित

जॉइस अरोरा यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितलं की, त्या दुबईत आपल्या मोठ्या बहिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आल्या होत्या. काही दिवसांनी स्वतःचाही वाढदिवस तिथेच साजरा केला. “3 मार्चला मी मुंबईला परतणार होते; मात्र युद्धामुळे आमची फ्लाइट रद्द झाल्याची माहिती मिळाली,” असं त्यांनी सांगितलं. त्या पुढे म्हणाल्या, “मी इथे सुरक्षित आहे. मी स्वतः आकाशात क्षेपणास्त्र इंटरसेप्ट होताना पाहिलं, जे थोडं भयावह होतं. पण दुबईची सुरक्षा यंत्रणा उत्तम काम करत आहे. माझ्या मुली अमृता आणि मलायका मुंबईत आहेत आणि त्यांना माहिती आहे की मी सुरक्षित आहे. आम्ही दिवसातून तीन-चार वेळा बोलतो.” काही उड्डाणे पुन्हा सुरू होत असल्याने लवकरच मुंबईला परतण्याची आशा त्यांनी व्यक्त केली.

मलायकाकडून खास शुभेच्छा

दरम्यान, 3 मार्च रोजी जॉइस अरोरा यांचा वाढदिवस दुबईतच साजरा झाला. या निमित्ताने मलायकाने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर करत आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. “हॅपी बर्थडे मॉम्सी... आमची बॅकबोन,” अशा शब्दांत तिने आईबद्दलचं प्रेम व्यक्त केलं. युद्धाच्या पार्श्वभूमीवर तणावपूर्ण परिस्थिती असली तरी जॉइस अरोरा सुरक्षित असल्याचं त्यांनी स्पष्ट केल्याने चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा

इराण म्हणजे नरक, महिलांवर जनावरांसारखे अत्याचार, बॉलिवूड अभिनेत्रीचा स्वत:च्या देशावर हल्लाबोल