Makarand Anaspure On Politics : सध्या राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान काही तासांवर आले आहे. तर, दुसरीकडे उर्वरित जागांसाठी प्रचाराचा धुरळा उडाला आहे. मागील पाच वर्षात राज्यातील राजकारणातही अनेक वळण आले. कधी नव्हे ते राज्यातील दोन मोठे राजकीय पक्ष फुटले आणि बंडखोरी करणाऱ्या गटाकडे पक्षाचे नाव आणि चिन्ह गेले. लोकप्रतिनिधींच्या बदलत्या भूमिकेवर मतदार नाराज आहेत. अभिनेते आणि  नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) यांनीदेखील यावर परखड भाष्य केले आहे. 


मकरंद अनासपुरे यांचा 'राजकारण गेलं मिशीत' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने मकरंद अनासपुरे यांनी 'एबीपी माझा'सोबत बोलताना मकरंद अनासपुरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले.  'राजकारण गेलं मिशीत' हा चित्रपट राजकारणावर व्यंगात्मक भाष्य करतो. ज्या व्यक्तीची राजकारणात जाण्याची इच्छा नसते, ती व्यक्ती राजकारणात गेल्यानंतर काय होते, याचे गमतीशीर आणि परखड भाष्य करणाऱ्या कथानकाभोवती चित्रपट असल्याचे त्यांनी सांगितले. 


मकरंद अनासपुरे यांना सध्याच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींबाबत विचारले असता त्यांनी  परखड मत व्यक्त केले. सध्या सुरू असलेला प्रकार हा आम्हा मतदारांची फसवणूक असल्यासारखे वाटते, असे  मकरंद अनासपुरे यांनी म्हटले. मतदान करताना तो उमेदवार, व्यक्ती पाहून मत दिले असते. आता, ज्याच्यावर विश्वास ठेवून मतदान केले असते त्या माणसाने कोलांटउडी मारल्यानंतर फसवणूक झाल्यासाऱखी वाटते, असे त्यांनी म्हटले. महाराष्ट्राचे भवितव्य हे तरुणाईच्या हाती असल्याचे त्यांनी म्हटले.


पवार की ठाकरे घराणे?


पवार की ठाकरे यापैकी कोणतं घराणे आवडीचे आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मकरंद अनासपुरे यांनी म्हटले की, पवार आणि ठाकरे या दोन्ही घराण्यांना इतकी वर्ष पाहत आलो आहे. आता दोन्ही घराणे एकत्र आल आहे. त्यामुळे आता या दोन्ही घराण्यांना वेगळं करता येणार नाही. 


एक दिवसाचा मुख्यमंत्री झालो तर...


मकरंद अनासपुरे हे सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. सामाजिक-राजकीय विषयांवरही ते भाष्य करतात. एक दिवसाचा मुख्यमंत्री झालो तर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करू आणि शेतकऱ्यांच्या विरोधात असणारे कायदे तात्काळ रद्द करू असे मकरंद अनासपुरे यांनी म्हटले. 


कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार?


ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, नाना पाटेकर यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मकरंद अनासपुरे यांनी निवडणुकीवर भाष्य केले. मला लोकांच्या मनाच्या मतदारसंघाची निवडणूक लढवण्यास आवडेल असे मकरंद अनासपुरे यांनी सांगितले.