Maithili Thakur Controversy: सध्या बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांचे (Bihar Assembly Elections 2025) वारे वाहु लागले आहेत. संपूर्ण बिहारमध्ये (Bihar Elections) प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळतेय. पण, यंदा बिहारचे राजकारण इतर निवडणुकांप्रमाणेच केवळ राजकारण्यांच्या आश्वासनांनी आणि घोषणांनी दुमदुमलेलं नाहीतर, यावेळी बिहारच्या निवडणुकीच्या रणांगणात एक नवा चेहरा पाहायला मिळतोय, तो म्हणजे, मैथिली ठाकूर (Maithili Thakur). ज्या आवाजानं कधी आपल्या सुमधूर आवाजात लोकगीतं आणि भजनं गाऊन देशभरातली लोकांची मनं जिंकलेली मैथिली आता राजकीय वर्तुळात आपलं नशीब आजमावण्यासाठी थेट विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आहे. पण, तुम्ही एक म्हण ऐकली असेल... अनुभवातून शहाणपण... याच म्हणीचा प्रत्यय मैथिलीच्या एका व्हायरल व्हिडीओतून येतोय. इतर अनुभवी आणि राजकीय वर्तुळातील दिग्गजांच्या तुलनेत लहान असलेल्या मैथिली ठाकूरच्या एका वक्तव्यावरुन सध्या प्रचंड खळबळ माजली आहे. तसेच, तिला तीव्र ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय.
मैथिली ठाकूर का करतेय ट्रोलिंगचा सामना?
बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, एका पत्रकारानं मैथिलीला विचारलं की, तुमच्या क्षेत्राच्या विकासाची ब्लूप्रिंट काय आहे? त्यावर मैथिली ठाकूरनं दिलेल्या उत्तरानं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मैथिलीनं पत्रकाराच्या प्रश्नावर क्षणभरही विचार केला नाही. अगदी तात्काळ तिनं जे उत्तर दिलं, त्यानं सर्वांच्या पायाखालची जमिन सरकली आहे. मैथिली अजिबात संकोच न करता कॅमेऱ्यासमोर म्हणाली की, "मी हे सर्वांसोबत कसं शेअर करू? ही पूर्णपणे वैयक्तिक आणि गोपनीय बाब आहे..."
मैथिलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होतोय. मैथिलीनं दिलेल्या उत्तरानंतर तिच्यावर ट्रोलर्स तुटून पडले. तिच्या उत्तरावर लोकांनी मीम्स बनवायला सुरुवात केली. काहींनी तिला 'राजकीय नवोदित' म्हटलं, तर काहींनी तिला 'ब्लूप्रिंटची सीक्रेट एजेंट' म्हटलंय.
सोशल मीडियावर ट्रोल्सचा महापूर
मैथिली ठाकूरचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सध्या भाजपची स्टार उमेदवार मैथिली ठाकूरच्या राजकीय ज्ञानावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एका युजरनं लिहिलंय की, "जेव्हा कोणी उमेदवार आपल्या क्षेत्राचा ब्लूप्रिंट सीक्रेट सांगतो, तर याचा अर्थ आहे की, त्याच्याकडे कोणताचा प्लान नाही..." दुसऱ्या एका युजरनं तर मैथिली ठाकूरवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. तिनं लिहिलंय की, "वोटर्सना अशी राजकीय मंडळी नकोत, जी कोणतंही उत्तर देताना पळून जातील... तर असे राजकारणी हवेत, ज्यांच्याकडे व्हिजन असेल..." तसेच, काही लोकांनी याला राजकारणाची नवी शैली असल्याचं सांगितलं आहे.
मैथिलीचा संगीत ते राजकारणापर्यंतचा प्रवास
25 जुलै 2000 रोजी बिहारमधील मधुबनी इथे जन्मलेली मैथिली ठाकूर लहानपणापासूनच संगीताच्या जगात रमलीय. तिचे वडील आणि आजोबा दोघेही संगीतकार होते, ज्यांनी तिला भारतीय शास्त्रीय आणि लोकसंगीताचे अनेक बारकावे शिकवले. 2017 मध्ये 'रायझिंग स्टार' या टीव्ही शोमध्ये उपविजेती झाल्यानंतर मैथिलीची ओळख देशभर पसरली. तिच्या भावांसोबत, तिनं शेकडो लोकगीतं आणि भजनं गाऊन सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स मिळवले. हळूहळू, तिचं नाव केवळ गायिका म्हणून नव्हे तर 'मिथिलाची कन्या' म्हणून प्रसिद्ध झालं. ही लोकप्रियता ओळखून, भाजपनं तिला पक्षात समाविष्ट केलं आणि यावेळी तिला अलीनगर मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली.
दरम्यान, मैथिली ठाकूरचं नाव बिहारच्या तरुण मतदारांमध्ये चर्चेचा विषय बनलंय. तिचे समर्थक तिला 'संस्कृती आणि तरुणाईच्या उर्जेचं प्रतीकट म्हणून गौरवतात, पण विरोधकांचा असा युक्तिवाद आहे की, प्रसिद्धी आणि राजकारण या दोन्ही पूर्णपणे भिन्न व्यासपीठ आहेत. 'सीक्रेट ब्लूप्रिंट' बद्दलच्या तिच्या वक्तव्यामुळे केवळ ओळखीच्या आधारे प्रसिद्ध चेहऱ्यांना तिकीट देणं हा राजकारणात नवा ट्रेंड बनला आहे का? अशी चर्चाही सध्या सुरू आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :