Mahesh Manjrekar First Wife Deepa Mehta Passed Away: ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नी दीपा मेहता यांचे 25 सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाची दु:खद बातमीमुळे सर्वांना धक्का बसला आहे. दीपा यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा सत्या मांजरेकर सोशल मीडियावर भावनिक पोस्टद्वारे हळहळ व्यक्त करताना दिसला. सत्याने आईच्या आठवणीत एक जुना फोटो शेअर केला असून, दीपा यांच्याबद्दल जवळच्या इतर व्यक्तींनी शेअर केलेल्या पोस्टही त्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर रीपोस्ट केल्या. फोटोसोबत सत्याने लिहिले, "मी तुला मिस करतोय, मम्मा."
दीपा मेहता प्रसिद्ध कॉस्ट्युम डिझायनर होत्या. त्यांच्या 'क्वीन ऑफ हार्ट्स' या साड्यांच्या ब्रँडने कला-विश्वात खास स्थान निर्माण केले. या ब्रँडची लोकप्रियता फक्त सामान्य लोकांमध्येच नाही, तर कलाविश्वातील अनेक लोकांमध्येही होती. दीपा यांची मुलगी अश्वमी मांजरेकर देखील 'क्वीन ऑफ हार्ट्स' ब्रँडसाठी मॉडेलिंग करते. दीपा यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला.
'बिग बॉस मराठी 5' फेम अभिनेत्री अंकिता प्रभू वालावलकरनेही हळहळ व्यक्त केली. त्यांनी म्हटले, "एक मार्गदर्शक हरवला... त्या फक्त आई नव्हत्या, तर अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत होत्या. त्यांच्या सामर्थ्याने, धैर्याने आणि स्वत:च्या व्यवसायाची निर्मिती करण्याच्या आवडीनं अनेक मुलींना मोठी स्वप्ने पाहायला शिकवले." अंकिताने त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली, तसेच सत्या प्रति संवेदना व्यक्त केल्या. अंकिताची पोस्ट सत्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली.
दीपा आणि महेश यांचे लग्न 1987 साली झाले होते. त्यांना दोन मुले आहेत सत्या आणि अश्वमी. घटस्फोटानंतर दोन्ही मुले दीपा यांच्यासोबत राहत होती, तरी वडिलांशी त्यांचा नाते कधीच तुटले नाही. घटस्फोटानंतर महेश यांनी दुसरे लग्न केले, आणि त्यांची दुसरी पत्नी अभिनेत्री मेधा मांजरेकर आहेत.