Mahesh Manjrekar On Siddharth Bodke: सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' (Punha Shivajiraje Bhosale) हा मराठमोळा सिनेमा (Marathi Movie) धुमाकूळ घालतोय. सिनेमा, सिनेमाची पटकथा आणि सिनेमाचा विषय प्रेक्षकांच्या मनाला भूरळ घालतोय. 31 ऑक्टोबर रोजी रिलीज झालेल्या सिनेमानं फक्त चारच दिवसांत बॉक्स ऑफिसवर ताबा मिळवला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या सिनेमात बळीराजावर होणारा अन्याय दाखवण्यात आलाय. उभ्या जगाच्या पोशिंद्याला हा अन्याय सहन होत नाही, त्यामुळे बळीराजाच्या मदतीसाठी थेट महाराज स्वतः येतात आणि भ्रष्ट राजकारण्यांना धडा शिकवतात. महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) दिग्दर्शित या सिनेमात छत्रपती शिवरायांची भूमिका ''देवमाणूस', 'दृष्यम 2' सारख्या सिनेमांमधून झळकलेला सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ बोडकेनं (Siddharth Bodke) साकारली आहे. पण, सिनेमा रिलीज होण्यापूर्वी मात्र मांजरेकरांच्या या निवडीला अनेकांचा विरोध होता. सिद्धार्थ महाराजांच्या भूमिकेसाठी योग्य नाही, असं अनेकांनी त्यांना सांगितलं होतं. तसेच, सोशल मीडियावरही यासंदर्भात जोरदार चर्चा रंगलेली. अशातच, आता स्वतः महेश मांजरेकरांनी सिद्धार्थची निवड का केली? यासंदर्भात खुलासा केला आहे.  

Continues below advertisement

महेश मांजरेकरांनी ओन्ली मानिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितलं की, "सिद्धार्थ बोडके हा काही स्टार नव्हता, जे मी त्याच्याकडे गेलो... मी त्याला बघितलं कधी माहितीये, त्याच्या नाटकाची जाहिरात बघितली एक... मग त्याचं 'अनन्या'मध्ये काम खूप चांगलं होतं,असं ऐकलेलं मी. मग 'दृश्यम 2'मध्ये छोटासा रोल पाहिला त्याचा. पण मला ना त्याला बघितल्यानंतर कायम असं वाटायचं की, हा शिवाजी महाराजांचा रोल चांगला करू शकेल. त्यात तो चांगला दिसेल. हा पहिला क्रायटेरिया होता. दुसरं म्हणजे, त्यानं थिएटर केलं असल्यानं त्याच्या अभिनयाबद्दल मला काही भीती नव्हती. आणि त्याला भेटलो, तेव्हा मला वाटलं हा नक्की करू शकतो..."

"मीसुद्धा विचार करत होतो, याला आपण नको घेऊया शिवाजी महाराज म्हणून..." (Siddharth Bodke In Punha Shivajiraje Bhosale Movie)

पुढे बोलताना महेश मांजरेकर म्हणाले की, "लोकांना वाटतं की, मी त्याला 'देवमाणूस'मधून तिकडे घेतला. पण तसं नाहीये. मी त्याला कास्ट केल्यानंतर तो 'देवमाणूस'मध्ये गेला. खरं तर मी 'देवमाणूस' करत असताना मी विचार करत होतो की, याला आपण नको घेऊया शिवाजी महाराज... कारण मी थोडासा घाबरलो. म्हंटल यानं एवढा निगेटिव्ह रोल केलाय. आणि तो चांगला केलाय. तर काय प्रभाव राहील का प्रेक्षकांवर? पण नंतर विचार केला की, नाही राहणार, म्हणजे मला जे पहिलं गट फिलिंग आलं ना की, हा शिवाजी महाराज चांगला करेल. मी त्या गट फिलिंगवर विश्वास ठेवला..."

"मी त्याला पाहिल्यावरच म्हटलं होतं की, तू माझ्याकडे छत्रपती शिवाजी महाराज करतोयस. तुला वजन कमी करावं लागेल आणि घोडेस्वारी शिकावी लागेल... तो तयार झाला..." मात्र सिद्धार्थचं कास्टिंग अनेकांना पटलं नव्हतं. मला सर्वांनी विरोध केला की, 'कोणीतरी नाववाला घे...' मी म्हटलं की, आपल्याकडे कोणीच नाववाला नाहीये. मला तोच योग्य वाटतोय...", असं महेश मांजरेकर म्हणाले. 

विक्रम गायकवाड यांच्या भूमिकेलाही झालेला विरोध 

'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या सिनेमातल्या दुसऱ्या एका महत्त्वाच्या भूमकेसाठी अभिनेता विक्रम गायकवाड यांच्या निवडीवरुनही मोठा विरोध झालेला. मुलाखतीत बोलताना महेश मांजरेकर यांनी याबाबतही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "विक्रम गायकवाड हा गुणी नट आहे. मी त्या पॉवरफुल भूमिकेसाठी विक्रमला घ्यायचे ठरवले, तेव्हाही सर्वांनी विरोध केला. मात्र, मी आपल्या निर्णयावर ठाम राहिलो, मी मध्ये चॅनेलवाल्यांना सिनेमा दाखवला, तेव्हा सर्वजण म्हणाले की, विक्रम गायकवाडने जबरदस्त काम केलंय..."

दरम्यान, 'पुन्हा शिवाजी राजे भोसले' सिनेमात सिद्धार्थ बोडके, विक्रम गायकवाड, त्रिशा ठोसर, भार्गव जगताप, सांची भोयर, पायल जाधव, सिद्धार्थ जाधव, पृथ्वीक प्रताप, सयाजी शिंदे, शशांक शेंडे आणि मंगेश देसाई अशी तगडी स्टारकास्ट झळकली आहे. सध्या सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतोय. प्रेक्षकांकडूनही सिनेमाला भरभरून प्रतिसाद मिळतोय.