Mahesh Bhatt Fed Human Flesh To Film Financier: बॉलिवूडच्या (Bollywood News) दिग्गज दिग्दर्शकांमध्ये समाविष्ट होणारे महेश भट्ट, म्हणजे, सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा भट्ट (Pooja Bhatt) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचे वडील. आजवर त्यांनी बॉलिवूडला अनेक हिट फिल्म्स दिल्या. त्यांच्या फिल्म्स आणि त्यांचे किस्से, लव्ह अफेअर्स यांच्या चर्चा अनेकदा रंगतात. पण, सध्या ते चर्चेत आहे, त्यांनी केलेल्या एका धक्कादायक खुलाशामुळे... अलिकडेच महेश भट्ट यांनी त्यांची मुलगी पूजा भट्ट हिच्या नव्या पॉडकास्टवर दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांच्या आयुष्यातील एका विचित्र वळणाची आठवण करून दिली. महेश भट्ट यांनी बोलताना सांगितलं की, त्यांनी कधीकाळी आर्थिक मदतीच्या बदल्यात एका फिल्म फायनान्सरला 'मानवी मांस' खाऊ घालण्याचा प्रयत्न केलेला.
एका फिल्म फायनान्सरला मानवी मांस खायला देण्याचा प्रयत्न मी केला होता, असं महेश भट्ट यांनी पूजा भट्टच्या पॉडकास्टमध्ये बोलताना सागितलं. महेश भट्ट यांनी वाराणसीतील एका तांत्रिकाच्या सल्ल्यानंतर, असं करण्याचा निर्णय घेतलेला आणि त्यांना विश्वास होता की, यामुळे त्यांचं नशीब एक दिवस नक्की बदलेल.
महेश भट्ट यांनी सांगितला 'तो' किस्सा (Bollywoo Director Mahesh Bhatt)
'द पूजा भट्ट शो'मधील गप्पांमध्ये महेश म्हणाले की, "जेव्हा मी वयाच्या 20 व्या वर्षी चित्रपट निर्माता म्हणून स्ट्रगल करत होतो. तेव्हा माझा मित्र अरुण देसाईही माझ्यासारखाच स्ट्रगल करत होता. अरुणनेच मला बिहारच्या गया येथील फिल्म फायनान्सरला भेटण्याचा प्रस्ताव दिला. परंतु, अरुण म्हणाला की, त्यांना वाराणसीमार्गे हा प्रवास करायचा होता, कारण त्याचे गुरु तिथे राहत होते आणि त्यांना वाटेत त्याला भेटायचं होतं."
महेश भट्ट पुढे बोलताना म्हणाले की, "आम्ही वाराणसीला पोहोचलो आणि माझा मित्र ज्या तांत्रिकाला भेटायला सांगत होता, त्याला भेटलो. तो एक तरुण होता, हातात रमची बाटली घेऊन नाचत होता... जरी मला त्यावेळी माहीत होतं की, काहीतरी गोंधळ सुरू आहे, तरी मी माझ्या मित्रामुळे गप्प राहिलो... तांत्रिकानं दुसऱ्या दिवशी आम्हा दोघांनाही फोन केला आणि म्हणाला, 'मी तुमच्या समस्या सोडवण्यासाठी काही उपाय सुचवतो."
त्यानं 'मानवी मांस' असलेलं पॅकेट फिल्म फायनान्सरला दिलं...
दुसऱ्या दिवशी, जेव्हा ते तिथे गेले, तेव्हा त्या तांत्रिकानं त्याचं कपाट उघडलं आणि रॅपरमध्ये गुंडाळलेली एक बॉलसारखी वस्तू बाहेर काढली. त्यानं एक तुकडा काढला, त्याचं एक पॅकेट बनवलं आणि म्हणाला, "वाराणसीच्या घाटावरून घेतलेलं हे 'मानवी मांस'... आता हे घे आणि तुझ्या चित्रपटाच्या फायनान्सरला खायला दे... ते खाल्ल्यानंतर तो तुला पैसे देईल..."
महेश भट्ट यांनी स्पष्ट केलं की, "आम्ही मानवी मांसाचं पॅकेट घेऊन निघालो आणि चित्रपटाच्या फायनान्सरला ते कसं खायला द्यावं, याचा विचार करू लागलो. मग आम्ही ते खायच्या पानात गुंडाळून खायला देण्याची योजना आखली आणि आम्ही तेच केलं. महेश भट्ट आणि त्यांचे मित्र त्यांच्या पुढच्या मिटिंगला ते मानवी मांस असलेलं पान घेऊन गेले आणि चित्रपटाच्या फायनान्सरला ते खायला भाग पाडलं. फायनान्सरनं हळूहळू पान तोंडात घातलं आणि चघळायला सुरुवात केली. त्या क्षणी, आम्हाला वाटलं की, आमचं नशीब बदलणार आहे आणि आता तो आम्हाला खूप पैसे देणार... पण सत्य हे आहे की, तेव्हापासून आम्हाला त्या फायनान्सरकडून कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :