Godavari Marathi Movie : महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला जोडणारा सिनेमा म्हणजे 'गोदावरी' (Godavari). इफ्फी महोत्सव, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल (NYIFF), वॅनकोवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, एफआयपीआरईएससीआय इंडिया ग्रँड प्रिक्स अशा अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या निखिल महाजन दिग्दर्शित 'गोदावरी' चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. 


31 ऑक्टोबरला नरिमन पॉईंट जवळच्या यशवंतराव सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सिनेमाच्या संपूर्ण टीमच्या उपस्थितीत हा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडणार आहे. 


या संदर्भात गोदावरी चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन म्हणतात, ''माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'गोदावरी'चा ट्रेलर लाँच होणार आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट असून सर्वांनी एकत्र पाहावा, असा हा चित्रपट आहे. आयुष्यात एखादी गोष्ट साध्य करताना अनेक गोष्टी, नाती मागे राहतात. नात्याचे मूल्य सांगणारा, नात्यांची नव्याने ओळख करून देणारा हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.''  


कुटुंबाला जोडणारा मराठी सिनेमा


'गोदावरी' हा महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला जोडणारा सिनेमा आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या टीझरमध्ये जितेंद्र जोशी आणि त्याच्या कुटुंबाच्या नातेसंबंधातील चढ-उतार, परंपरा आणि भावनांचे उत्तम मिश्रण पाहायला मिळत आहे. या कुटुंबाचं आणि 'गोदावरी'चं नक्की काय नातं आहे, हे टीझरवरून फारसं स्पष्ट कळत नाही. त्यामुळे उत्कंठा निर्माण करणारा हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहण्यासारखा आहे.  


जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे, ब्लू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित या चित्रपटात जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नात्यांची मूल्य सांगणारा, रुढी, परंपरा आणि भावनांचे उत्तम मिश्रण असलेला, असा हा कौटुंबिक चित्रपट येत्या 11 नोव्हेंबरला रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.


महत्वाच्या बातम्या : 


Khal Khal Goda Song: "खळ खळ गोदा"; गोदावरी चित्रपटातील गाणं प्रदर्शित