Bollywood Superstar Madhuri Dixit Life Story: बॉलिवूडवर (Bollywood News) राज्य करणारी 'लेडी सुपरस्टार' (Lady Superstar), कित्येक तरुणांच्या दिलाची धडकन अन् चाहत्यांची लाडकी 'धक धक गर्ल' पण, कधीकाळी तिच्या नशीबी आलेला नकार. तिनं इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला, पण तिला पहिलाच नकार आला. दूरदर्शनं तिला रिजेक्ट केलं. त्यानंतर पहिला सिनेमा मिळाला, पण तोसुद्धा सुपरफ्लॉप ठरला. पण, नंतर तिचं नशीब पालटलं आणि मग त्यानंतर आजतागायत तिनं कधीच मागे वळून नाही पाहिलं. आम्ही ज्या बॉलिवूडच्या 'लेडी सुपरस्टार'बाबत बोलतोय, तिचं नाव माधुरी दीक्षित (Madhuri Dixit). बॉलिवूडमध्ये आपला जम बसवलेली मराठमोळी अभिनेत्री सुपरस्टार माधुरी दीक्षित.
माधुरी दीक्षित (Bollywood Actress Madhuri Dixit) ही बॉलिवूडच्या सुपरस्टार अभिनेत्रींपैकी एक. वयाच्या साठीच्या उंबरठ्यात असूनही माधुरी आजही आपल्या अदांनी अनेकांना घायाळ करते. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत तिनं अनेक सुपरहिट सिनेमे दिलेत. केवळ आपल्या अभिनयकौशल्यामुळेच नव्हे, तर आपल्या मोहक नृत्यशैलीमुळेही तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. एके काळी, माधुरी दीक्षितनं एक 'सुपरस्टार' नायिका म्हणून बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं होतं. त्यावेळी ती या क्षेत्रातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती. अनेक वर्ष तिनं बॉलिवूडवर आपली छाप पाडली. मात्र, फार कमी लोकांना हे माहीत आहे की, माधुरी दीक्षितनं आपल्या कारकिर्दीची सुरुवात प्रत्यक्षात एका 'फ्लॉप' सिनेमानं केली होती. इतकंच नव्हे, तर 'दूरदर्शन'नंही तिला नाकारलं होतं.
15 मे 1967 रोजी मुंबईत जन्मलेल्या माधुरी दीक्षितला लहानपणापासूनच नृत्याची प्रचंड आवड होती. वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षापासूनच 'कथ्थक' शिकण्यास तिनं सुरुवात केली. माधुरीची मूळ इच्छा एक 'मायक्रोबायोलॉजिस्ट' बनण्याची होती. पण, नशिबानं तिला अभिनयाच्या विश्वाकडे वळवलं. 1984 मध्ये, दूरदर्शननं तिच्या पहिल्या दूरचित्रवाणी कार्यक्रमाचा प्रस्ताव नाकारला, आणि त्याच वर्षी प्रदर्शित झालेला तिचा पहिला सिनेमा, 'अबोध' देखील व्यावसायिकदृष्ट्या अपयशी ठरला. तरीही, माधुरीनं हार मानली नाही. 1988 मध्ये, 'तेजाब' सिनेमातील 'एक दो तीन' या गाण्यानं तिला रातोंरात यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं आणि ती एक 'सुपरस्टार' बनली. त्यानंतर, 'दिल', 'बेटा' आणि 'हम आपके हैं कौन..!' यांसारख्या सिनेमांच्या माध्यमातून तिनं हे सिद्ध केलं की, ती केवळ एक उत्कृष्ट नृत्यांगनाच नाही, तर खऱ्या अर्थानं अभिनयाची 'राणी' आहे.
माधुरीनं वयाच्या नवव्या वर्षी नृत्यासाठी स्कॉलरशिप मिळवली होती. तिचं शास्त्रीय नृत्याचं सादरीकरण, विशेषतः 'तेजाब' सिनेमातील 'मोहिनी' आणि 'देवदास'मधील 'चंद्रमुखी' या भूमिका, भारतीय चित्रपटसृष्टीत आजही मैलाचा दगड मानल्या जातात.
पहिलाच सिनेमा सुपरफ्लॉप, पण... (Madhuri Dixit First Movie Abodh Flop)
राजश्री प्रॉडक्शन्सच्या 'अबोध' सिनेमानंतर तिला अपयश आलं असलं तरी, त्यानंतर तिनं लहान आणि मोठ्या अशा विविध निर्मितीसंस्थांच्या सिनेमांमध्ये काम केलं. तिनं दूरदर्शनवरील 'पेईंग गेस्ट' या मालिकेतही छोटी भूमिका साकारली होती. मात्र, 'तेजाब' सिनेमानंतर तिच्या कारकिर्दीला खरी गती मिळाली आणि ती आघाडीच्या अभिनेत्रींच्या श्रेणीत सामील झाली.
1990 च्या दशकात माधुरी दीक्षित बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी आणि सर्वात यशस्वी अभिनेत्री होती. 'दिल', 'साजन', 'खलनायक' आणि 'हम आपके हैं कौन..!' यांसारखे सुपरहिट सिनेमे देऊन तिनं स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं.
1999 मध्ये डॉ. नेने यांच्याशी विवाह केल्यानंतर तिनं अभिनयातून काही काळ विश्रांती घेतली आणि अमेरिकेत स्थायिक झाली. तरीही, 2007 मध्ये 'आजा नचले' सिनेमाद्वारे तिनं शानदार कमबॅक केलं आणि 'धक-धक गर्ल'ची जादू कधीच ओसरू शकत नाही, हे सिद्ध केलं. सध्या माधुरी केवळ सिनेमे आणि वेब सिरीजमध्ये काम करत नाही, तर विविध डान्स रिअॅलिटी शोजमध्ये परीक्षक म्हणूनही सक्रिय आहे. तिचं स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस आहे आणि ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी कनेक्टमध्ये असते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
ABP माझाच्या बातम्या LIVE...
