बाप होण्यासाठी निर्णय घेतला, पण तरीही शेवटच्या श्वासापर्यंत खंत राहिलीच; मधुबाला अन् दिलीपकुमारांच्या नाजूक नात्यावर अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा
Madhubala and Dilip Kumar Love Life: मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या लव्हस्टोरीची खूप चर्चा झाली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात वेडे होते, पण यामुळे ते वेगळे झाले.

Madhubala and Dilip Kumar Love Life: दिलीप कुमार आणि मधुबाला (Madhubala and Dilip Kumar Love Story) यांची अजरामर लव्ह स्टोरी आपल्याला माहीत आहेच, दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करायचे, पण हे नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलेलं नाही. दिलीप कुमार यांनी मधुबालाशी संबंध तोडले आणि सायरा बानूशी (Saira Banu) लग्न केलं. मधुबालानं किशोर कुमार (Kishor Kumar) यांच्याशी लग्नगाठ बांधली. त्यावेळी संपूर्ण इंडस्ट्री हादरली होती. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या जोडप्यानं क्षणात आपलं नातं का तोडलं? याचा सुगावा कुणालाच लागला नव्हता. सारेच हादरले होते. चाहतेही हैराण होते. मधुबाला आणि दिलीप कुमार यांचे नाते का तुटले याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या गेल्या, पण आज कित्येक वर्षांनी मधुबाला आणि दिलीप कुमार यांचं नातं का तुटलं? याचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज (Mumtaz) यांनी आता एका अशा कारणाचा खुलासा केलाय की, जे यापूर्वी कधीच समोर आलं नव्हतं.
मधुबाला आणि दिलीप कुमार यांची ऑन-स्क्रीन जोडी सुपरहिट होती. या दोघांनी 'मुघल-ए-आझम'मध्ये एकत्र काम केलं होतं. त्यावेळी त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित जोड्यांपैकी एक मानलं जात असे. दिलीप कुमार यांच्या बहिणीनं एका मुलाखतीत बोलताना दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्या नात्याबाबत खुलासा केला होता. त्या म्हणाली होती की, बी. आर. चोप्रा यांच्याविरुद्ध कोर्टात खटला नसता तर त्यांनी लग्न केलं असतं, या प्रकरणामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. पण, आता दोघांच्या नात्याबाबत वेगळंच कारण समोर आलं आहे. दिग्गज अभिनेत्री मुमताज यांनी एका नव्या मुलाखतीत बोलताना सांगितलं की, मधुबाला यांना मुल होऊ शकत नसल्यानं, दिलीप कुमार यांनी त्यांना सोडलं.

विक्की लालवानी यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना दिग्गज अभिनेत्री मुमताज यांनी मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्याबाबत एक हादरवणारा खुलासा केला आहे. मुमताजनं सांगितलं की, दिलीप कुमार यांना मुल हवं होतं आणि मधुबाला कधीच गरोदर राहू शकत नव्हती. पण, दिलीप कुमार यांना मुल हवं होतं. त्यामुळे त्यांनी मधुबाला यांच्याशी नातं तोडलं आणि सायरा बानो यांच्याशी जोडलं.
मधुबालानं नाही, दिलीप कुमारांनी नातं तोडलं होतं...
पॉडकास्टमध्ये बोलताना मुमताज म्हणाल्या की, "दिलीप कुमार आणि मधुबाला यांचं नातं फारच घट्ट होतं. मधुबाला मला फार आवडायची. तिच्या शेवटच्या क्षणीही मी तिथे होते. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मधुबालानं त्यांच्यावरच प्रेम केलं. दिलीप कुमारांनी मधुबालाला सोडलं होतं, कारण ती कधीच गरोदर राहू शकत नव्हती, आई होऊ शकत नव्हती. मधुबालाला सोडल्यानंतर दिलीप कुमार सायरा बानोच्या प्रेमात पडले आणि त्यांच्याशी लग्न केलं. सायरा बानोही खूपच छान होती. त्यांनी दिलीप कुमारांना सांभाळलं, त्यांची खूप काळजी घेतली. त्यांच्यावर जीवापाड प्रेम केलं."

"दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या वयात खूपच अंतर होतं. पण, मला वाटतं की, प्रेमात वय अजिबातच महत्त्वाचं नसतं. मला वाटत नाही की, कोणीही असं म्हणेन की, मधुबालानं दिलीप कुमारांवर प्रेम केलं नाही. मधुबाला दिलीप कुमारांसाठी वेड्या होत्या. पण, दिलीप साहेबांना मुल हवं होतं, कदाचित यासाठीच त्यांनी मधुबालाला सोडून सायरा बानोशी लग्न केलं. मधुबालानं मला याबद्दल सांगितलेलं. त्यांनी सांगितलेलं की, मला दिलीप खूपच आवडायचा. पण मी हृदयविकारानं ग्रस्त आहे, त्यामुळे मला मूल होऊ शकलं नाही. मी दिलीप कुमारला दोष देऊ शकत नाही. कारण प्रत्येक पुरूषाला मूल हवं असतं.", असं मुमताज म्हणाल्या. तसेच पुढे बोलताना एवढं करुनही दिलीप कुमारांना मुल झालं नाही, याचं वाईट वाटतंय, असं मुमताज म्हणाल्या.
दरम्यान, मधुबालानं किशोर कुमार यांच्याशी लग्न केलं होतं. पण, या नात्याचाही दुःखद अंत झाला. 1969 मध्ये वयाच्या 36 व्या वर्षी मधुबालानं जगाचा निरोप घेतला. तर, दिलीप कुमार यांचं निधन 2021 मध्ये वयाच्या 98 व्या वर्षी झालं. बॉलिवूडमधील काही गाजलेल्या प्रेम कहाण्यांपैकी एक, दिलीप कुमार आणि मधुबालाची प्रेमकहाणी असल्याचं आजही सांगितलं जातं. पण, या प्रेमाला दोघेही नाव देऊ शकले नाहीत, याची खंत आजही त्यांच्या चाहत्यांच्या मनात कायम आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























