मुंबई : अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आपल्या चित्रपटांमध्ये वेगळ्या प्रयोगांसाठी चर्चेत असतो. त्याच्या आगामी लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटाची देखील अशीच चर्चा सुरु आहे. कोरोनामुळं लांबलेलं या सिनेमाचं प्रदर्शन कधी होणार हा सवाल सिनेप्रेमींना होता. यावर खुद्द अक्षयकुमारनं उत्तर दिलं आहे. काल, बुधवारी त्यानं एक ट्वीट करत लक्ष्मी बॉम्बच्या रिलिज तारखेची घोषणा केली. सोबतच त्यानं एक टीझर देखील दिला आहे. हा सिनेमा आता दिवाळीत म्हणजे 9 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचं अक्षयनं म्हटलं आहे.

अक्षय कुमारनं चित्रपटाच्या अपडेटसह एक टीझर देखील शेअर केला आहे. त्यात अक्षय साकारत असलेल्या रोलची एक प्रतिमा दिली आहे. OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणाऱ्या सात मोठ्या चित्रपटांपैकी एक मोठा चित्रपट म्हणून लक्ष्मी बॉम्बची घोषणा झाली होती.

ट्विटरवर पोस्ट शेअर करत अक्षयनं म्हटलं आहे की, या दिवाळीला तुमच्या घरी 'लक्ष्मी' सोबत धमाकेदार 'बॉम्ब ' देखील येणार आहे.

आयपीएलचा ओटीटीवरील सिनेमांना फटका 

हिंदी सिनेमावाल्यांना ओटीटीचं व्यासपीठ आपलं वाटू लागलं आहे. सिनेमे थिएटरवर रिलीज झाले नाहीत तरी ते ओटीटीवर रिलीज करून फायदा करून घेण्याकडे कल आहे. पूर्वी आयपीएल, वर्ल्डकप आले की सिनेमागृहाच्या तिकीट खिडकीवर परिणाम व्हायचा. तसा परिणाम ओटीटीवर होणार आहे. ओटीटी व्यासपीठावर अनेक सिनेमे आले. आता येत्या काळातही येणार आहेतच. पण आयपीएलचा मौसम लक्षात घेऊन ओटीटीवर येणाऱ्या भुज, लक्ष्मी बॉम्ब यांसारख्या सिनेमांना फटका बसणार आहे. कारण आयपीएल ज्या ओटीटीने घेतलाय त्याच ओटीटीवर हे सिनेमे येणार आहेत. डिस्ने हॉटस्टारवर आयपीएल दाखवली जाणार आहे. आता हा हंगाम सुरू होणार आहे १९ तारखेपासून. १९ सप्टेंबरला हा महौल जमून येईल तो १० नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. आयपीएलची भारतात आणि एकूणच जगभरात असलेली क्रेझ लक्षात घेऊन त्याच ओटीटीवर रिलीज होणारे सिनेमे काही काळासाठी थांबवले जातील.