'ब्राह्मण समाजबद्दल द्वेष निर्माण करणारी व्यवस्था बंद करावी', चिवित्रा पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात कोणाचं वक्तव्य?
Laxman Gaikwad : 'ब्राह्मण समाजबद्दल द्वेष निर्माण करणारी व्यवस्था बंद', चिवित्रा पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात कोणाचं वक्तव्य?

Laxman Gaikwad, Pune : "समाजातील जातिव्यवस्था, वर्णभेद तसेच स्त्री-पुरुषातील असमानता यांसारख्या कालबाह्य आणि संकुचित विचारसरणीचे उच्चाटन करून साहित्यिकांनी समाजाला मानवतेच्या मार्गाकडे नेण्यासाठी दर्जेदार साहित्याची निर्मिती करणे आवश्यक आहे. तेव्हाच मराठी साहित्याला जागतिक स्तरावर मान्यता आणि उंची प्राप्त होईल," असे प्रतिपादन 'उचल्या' या कादंबरीचे लेखक लक्ष्मण गायकवाड (Laxman Gaikwad) यांनी रविवारी (दि.17) केले. ब्राह्मण समाजाविषयी द्वेष निर्माण करणारी व्यवस्था बंद केली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. श्रीविद्या प्रकाशनतर्फे प्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक यांच्या 'चिवित्रा' या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन गायकवाड आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला श्रीविद्या प्रकाशनच्या श्रीती कुलकर्णी उपस्थित होत्या.
गिरीश ओक लेखनातूनही संवेदना जागवणारे मनस्वी कलाकार - अमोल कोल्हे
डॉ. गिरीश ओक हे चित्रपट, मालिकांसोबतच रंगभूमीशी घट्ट नातं टिकवून ठेवणाऱ्या मोजक्या कलावंतांपैकी आहेत. इतकेच नाही तर आपल्या अभिनयातूनच नाही तर लेखनातूनही संवेदना जागवणारे मनस्वी कलाकार आहेत.' असे प्रतिपादन खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.
या वेळी अमोल कोल्हे म्हणाले, 'अभिनय क्षेत्रातील उमेदीच्या काळात डॉ. गिरीश ओक माझ्यासाठी हक्कानं आपलं मन मोकळं करण्याचं आदराचं स्थान होते. माझ्या राजकीय कारकीर्दीची सुरुवातही त्यांच्याच शुभेच्छांमुळे झाली. इतकेच नाही तर आपल्या अनुभवांबद्दल कायम लिहीत राहा, असा सल्लाही ते नेहमी देत असतात.' साहित्यिक लक्ष्मण गायकवाड म्हणाले, 'साहित्य केवळ रंजन करत नाही तर विचारांनाही दिशा देते. सभोवतालच्या अनुभवांचे डॉक्टर ओक यांनी केलेले लेखन त्यामुळेच वाचकांना समृद्ध व विचारांना चालना देणारे आहे. अशा प्रकारचे लेखन त्यांनी सातत्याने करत राहावे.'
वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उत्साहवर्धक असतो - गिरीश ओक
गिरीश ओक म्हणाले, 'लेखनाला लाभलेला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उत्साहवर्धक असतो. मान्यवर नाटकारांचे, साहित्यिकांचे शब्द सादर करताना होत असलेला आनंद आपणच लिहिलेल्या साहित्याचे अभिवाचन करताना अधिक द्विगुणीत होतो. हा अनुभव मोठा विलक्षण असतो.' याप्रसंगी ओक यांनी पुस्तकातील 'विंगभूमी' या प्रकरणाचे अभिवाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी गोखले यांनी तर आभार देवीन कुलकर्णी यांनी मानले.
इतर महत्त्वाच्या बातम्या























