मुंबई : यावर्षीच्या मंगेशकर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून उद्योजक आणि पद्मविभूषण कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार (Lata Mangeshkar Award) जाहीर करण्यात आला आहे. तर संगीत, नाटक, साहित्यासह सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार (Deenanath Mangeshkar Award) पुरस्कार जाहीर झाला आहे. 24 एप्रिलला सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. 

ज्येष्ठ लेखक श्रीपाल सबनिस यांना साहित्य क्षेत्राचा तर 'असेन मी नसेन मी' या नाटकाला नाट्य श्रेत्रातील पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी आरंभ सोसायटी फॉर ऑटिझम या सामाजिक संस्थेलाही सन्मानित करण्यात येणार आहे. अभिनेते सचिन पिळगावकर, शरद पोंक्षे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, श्रद्धा कपूर यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने या पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. दरम्यान दीनानाथ मंगेशकर पुरस्कार नेमका कुणाकुणाला जाहीर झाला आहे ते पाहुयात, 

लता मंगेशकर पुरस्कार - पद्मविभूषण कुमार मंगलम बिर्ला 

Deenanath Mangeshkar Award 2025 : दीनानाथ मंगेशकर पुरस्कार - 

  • अभिनेत्री श्रद्धा कपूर
  • वायोलिनिस्ट एन.राजम
  • ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर
  • अभिनेता शरद पोंक्षे
  • अभिनेत्री सोनाली कुलकर्णी
  • गायिका रीवा राठोड

दीनानाथ मंगेशकर जयंती म्हणजेच 24 एप्रिल रोजी पार्ल्यातील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात  हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते मंगेशकर पुरस्कार दिला जाईल. 

आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष पद्मविभूषण कुमार मंगलम बिर्ला यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वासाठी आणि भारताच्या विकासातील अतुलनीय योगदानासाठी त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. सन 2022 मध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेला हा प्रतिष्ठित पुरस्कार यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आशा भोसले आणि अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आला आहे.