Lakshmichya Pavlanni: 'लक्ष्मीच्या पावलांनी' ही मालिका गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अद्वैत आणि कला या दोघांच्या जोडीने अगदी काही महिन्यांमध्येच प्रेक्षकांची मनं जिंकली. चांदेकर आणि कलाच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. पण, सध्या या मालिकेत एक नवाच ट्विस्ट आलाय. कलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री इशा केसकर मालिका सोडणार असल्याच्या चर्चा आता खऱ्या ठरल्यात. लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेला एक नवं वळण लागलंय. या संदर्भातील प्रोमो सध्या समोर आलाय. या प्रोमोमध्ये कला मरणाच्या दारात उभी असल्याचा दाखवण्यात आलंय. अद्वैत तिच्यासाठी गाणं म्हणतोय.अद्वैतच गाणं ऐकता ऐकताच कला शेवटचा श्वास घेते असं या प्रमोत दाखवण्यात आलंय. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनाही धक्का बसलाय.
नेमकं काय आहे प्रोमोत?
लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत कलाला राहुल आणि आत्याचा सत्य कळतं. हेच अद्वैतला सांगायला ती जाणार एवढ्यात तिचा अपघात होतो. तिच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतं. जी सुकन्या तिला रुग्णालयात नेते तिला हृदयाचा त्रास आहे त्यामुळे कला आपलं हृदय सुकन्याला देणार आहे. अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर या मालिकेत सुकन्याचं पात्र साकारणार आहे. अशातच या मालिकेचा नवा प्रोमो समोर आलाय.
या प्रोमोत ऑक्सीजन मास्क लावलेल्या कलासमोर चांदेकर येतो तेंव्हा कलाला त्यांच्या घराचा सत्य अद्वैतला सांगायचं असतं. भरलेल्या डोळ्यांनी चांदेकर कलासमोर येतो तेव्हा ती त्याला गाणं म्हणायला लावते. त्याचवेळी कलाच्या चेहऱ्यावरचे भाव थांबतात. कलाचा शेवट पाहताना चाहतेही रडकुंडीला आले. अनेकांनी या प्रोमोवर कमेंट्स केल्या आहेत. कला मालिका सोडणार असल्याचं कळताच अनेकांनी 'कलाला कुणीही रिप्लेस करू शकत नाही,तिचं पात्र गेलं तर मालिका कोण बघणार " कला आणि अद्वैतमुळे ही मालिका बघावीशी वाटते ' अंगावर काटा आला .. 'अशा कमेंट्स केल्या आहेत.
दुसरीकडे स्टार प्रवाहने नुकताच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये कलाच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांनी अद्वैत मंदिरात गेलेला दिसतो. तिथे सुकन्या देवीसमोर प्रार्थना करत हे तुझे इच्छेने झाल्याचं सांगते. आता हे हृदय देणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाला भेटून त्यांचे मनापासून आभार मानायचेत असं म्हणताच ती अद्वैतला धडकते. ते दोघे एकमेकांकडे बघतात. कलाच्या हृदयात अद्वैत असल्यामुळे सुकन्या ही अद्वैतच्या प्रेमात पडते का? याची चाहत्यांना उत्सुकता आहे.