Ankita Walawalkar On Vaishnavi Hagawane Case: पुण्यातील (Pune Crime) वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर (Vaishnavi Hagawane Case) लग्न व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. 9 महिन्यांच्या चिमुकल्या बाळाची आई असलेल्या वैष्णवीनं गळफास लावून स्वतःला संपवलं. सासरच्यांच्या छळाला कंटाळून वैष्णवीनं स्वतःचं आयुष्य संपवलं. याप्रकरणानंतर लग्न व्यवस्था, लग्नासाठी केला जाणारा वारेमाप खर्च, लाखोंची होणारी उधळपट्टी यावरही मोठ्या चर्चा रंगल्या. वैष्णवीच्या सासरच्यांना अटक करण्यात आली असून सर्वांची कसून चौकशी सुरू आहेत. या प्रकरणात अनेक महत्त्वाच्या बाबी समोर येत असतानाच आता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल (Kokan Hearted Girl) अंकिता वालावलकरनं (Ankita Walawalkar) सोशल मीडियावर एक व्लॉग शेअर केला आहे.
अंकिता वालावलकरनं नुकताच तिच्या युट्यूब चॅनलवर (YouTube Channel) एक व्लॉग शेअर केला आहे. या व्लॉगमध्ये अंकिता पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर बोलली. तसेच, तिनं थेट आपल्यामुळेच वैष्णवी गेली, असंही म्हटलं आहे. त्यासोबतच सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्या आणि मोठमोठ्या कमेंट करणाऱ्यांनाही अंकितानं खडे बोल सुनावले आहेत.
'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर नेमकं काय म्हणाली?
'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरनं आपल्या व्लॉगची सुरुवातच "नमस्कार मंडळी, मी वाचलेली वैष्णवी बोलतेय.", अशी केली. त्यापुढे ती म्हणाली की, "तुम्हाला माहितीय का? वैष्णवी गेलीय... पण ती का गेली माहितीय? आपल्यामुळेच... आपण सगळे जबाबदार आहोत. आणि स्पेशली ते जे मोठमोठे कमेंट लिहितात ना, ते सर्व जबाबदार आहेत.", असं अंकिता वालावलकर म्हणाली.
"वैष्णवी हगवणे प्रकरणात काहींना वाटलं ती चुकली, काहींना वाटलं तिचे आई-वडील चुकले तर काहींना वाटलं तिच्या सासरचे चुकले. बरेच जण तर आता तिच्या चारित्र्यावर सुद्धा शिंतोडे उडवत आहेत. पण तुम्ही हा विचार केलात का की त्या मुलीला तेव्हा काय वाटलं असेल. जीव द्यायला सुद्धा हिम्मत लागते... मला विचारा! ती हिम्मत जर त्या मुलीमध्ये असेल तर त्या मुलीची चारही बाजूने कोंडी झालेली असते. मुलींच्या बाबतीत असं काही झालं तर मला खूप चिड येते. कारण मी सुद्धा यामधून गेले आहे.", असं अंकिता म्हणाली.
"त्या मुलीने दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला पण तरीही तिला कोणी सिरीयसली घेतलं नाही. तिला फक्त तिने आपल्याला घाबरवलं की काही करूच शकत नाही असं दाखवलं त्यामुळे ती आणखी या टोकाच्या पावलापर्यंत गेली. एखादा श्रीमंत मुलगा असेल तर श्रीमंती बघून लग्न केलं असे टोमणे मारले जातात. मुलीचा आवाज दाबला जातो. मी जेव्हा स्वतः माझ्याबद्दल लोकांना सांगितलं तेव्हा कमेंट सेक्शन मध्ये ट्रोल केल्या गेलं. मी एका मोठ्या शो मध्ये माझ्याबद्दल सांगितलं तिथेही तसाच झालं. मी या गोष्टींकडे लक्ष देत नाही. मी त्या गोष्टी फाट्यावर मारून पुढे आले आहे त्यामुळे कुठे माझं भलं झालंय.", असं अंकिता वालावलकर म्हणाली.
"ते सुद्धा करताना समाजाने मला जी वागणूक दिली ते तुम्ही बघितला आहे का? हा प्रकार झेलण्याची सगळ्यांचीच कुवत नसते ती नशिबाने देवाने मला दिली. त्यामुळेच मी हे सगळं पार करू शकले नाही तर या वैष्णवी हगवणेच्या जागी एखादी अंकिता दिसली असती जिने जीव दिला असता. या सगळ्याला कारणीभूत आपला समाजात असतो जो प्रत्येक वेळी त्या मुलीला, तिच्या कपड्यांना , तिच्या कुटुंबाला जज करत असतो.", पुढे बोलताना अंकिता म्हणाली.
"बऱ्याच जणांनी असा सुद्धा म्हटलं की, वैष्णवीला तिच्या आई-वडिलांनी पुन्हा तिथे का पाठवलं चूक तिच्या आई-वडिलांचीच आहे... याबाबत सुद्धा माझ्यावरून एक किस्सा मी शेअर करते. एकदा एक काका आमच्या घरी आलेले आणि ते म्हणालेले की आज काल तुमची मुलगी इकडेच असते! तेव्हा माझी आई वाघिणीसारखी त्या माणसावर बरसलेली तुम्हाला जड झाली आहे का मुलगी? मला माझी मुलगी जड झालेली नाही, मी माझ्या मुलीचं भविष्य पाहू शकते. तुम्ही काळजी करू नका.", असं अंकिता म्हणाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
